मुख्यालयात राहणार नसाल तर घरभाडे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:39+5:302021-02-09T04:24:39+5:30
बहुजन हक्क अभियानचे जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रांत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक असून, किती ...
बहुजन हक्क अभियानचे जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रांत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक असून, किती कर्मचारी मुख्यालयात राहतात, याविषयीची माहिती आरोग्य विभागाकडे मागितली होती. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. गायकवाड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयात राहणे बंधनकारक करणारा आदेश जारी केला आहे. यापूर्वी वारंवार तसा आदेश काढण्यात आला होता, असेही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात जनतेला अहोरात्र आरोग्य सेवा मिळावी हा शासनाचा हेतू असतो; परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी सोलापूर शहराकडे धाव घ्यावी लागते. महागडे उपचार त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे ही सक्ती केली आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहत असल्याचे संबंधित गावांच्या ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र तीन दिवसांत सादर करावे अन्यथा त्यांच्या वेतनातून दिला जाणारा घरभाडे भत्ता बंद करावा लागेल, अशी तंबी देण्यात आली आहे.