पुतळा विटंबना प्रकरणाचे मंगळवेढ्यात पडसाद; आॅल इंडिया पँथर सेनेचे रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 03:16 PM2020-10-29T15:16:50+5:302020-10-29T15:17:05+5:30
बांधव आक्रमक; मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या राजीनाम्यांची मागणी
मंगळवेढा : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बदार्पूर येथे अज्ञातांनी महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात बोराळे नाका येथे रास्ता रोको करण्यात आला.
महापुरूषाच्या पुतळ्याची दगडफेक करुन मोडतोड करुन विटंबना केलेली आहे. त्याचप्रमाणे लातूर, अकोला व महाराष्ट्रात वारंवार दलित, ओबीसी, आदिवासी बहुजनांवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा जातीयवादी गावगुंडांना आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या सरकारला दलित, ओबीसी, पारधी, आदिवासी या लोकांविषयी अस्मिता नाही हे सिद्ध होत आहे.
जर अशा आरोपींना शासन करण्यास हे सरकार असमर्थ असेल तर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन त्वरीत राजीनामा द्यावा़ याशिवाय अशा गावगुंड, जातीयवादी आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करुन अशा नराधमांना आम्हाला पँथरप्रमाणे धडा शिकवण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार, प्रशासन व पोलीस प्रशासन यांची राहिल असा इशारा आॅल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.
याप्रसंगी आॅल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे, डी.के.साखरे, विकी ढावरे, विजय शिकतोडे, अमित लोखंडे, नितीन आठवले, विशाल भंडारे, वैशाली सावंत, रेश्मा चंदनशिवे आदीजन उपस्थित होते.