आयुक्त गुडेवार यांची बदली; विरोधक रस्त्यावर
By admin | Published: June 22, 2014 12:23 AM2014-06-22T00:23:57+5:302014-06-22T00:23:57+5:30
शासनाचा निषेध : विविध पक्ष, संघटनांच्या वतीने निदर्शने
सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याच्या कारणावरून बहुजन समाज पार्टी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आदी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. नेत्यांनी शासनाचा निषेध करीत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली.
आयुक्त गुडेवार यांची पुन्हा त्यांच्या मूळच्या खात्यात बदली झाली आहे. सोमवारी मंत्रालयातून यासंबंधीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. या वृत्ताला स्वत: गुडेवार यांनीही दुजोला दिला होता. ही बातमी वृत्तपत्रात येताच शनिवारी विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले. बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात आले. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरो आंदोलन करून शासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. चंद्रकांत गुडेवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नियमात राहून काम करीत असताना केवळ राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी नेत्यांनी जाणीवपूर्वक गुडेवार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बहुजन समाज पार्टी हा अन्याय कदापी सहन करणार नाही, त्यांची बदली रद्द झाली पाहिजे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आनंद चंदनशिवे यांनी दिला. यावेळी नगरसेविका उषा शिंदे, सुनीता भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर शिवसेनेच्या वतीने महापौर अलका राठोड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर ,विष्णू कारमपुरी, शाहू शिंदे, सुनील शेळके, संतोष पाटील, संजय कणके, सहदेव येलुरे, सुनील कामाठी, भीमाशंकर म्हेत्रे आदी सामील झाले होते. डी.वाय.एफ.आय.च्या वतीनेही महापौर कक्षासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी महापौर कक्षातील खुर्च्या फेकून आपला राग व्यक्त केला.
भाजपा नगरसेवकांनी पार्टी बैठक घेऊन शासनाच्या बदली आदेशाचा निषेध केला. यावेळी नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. मनपा कामगार संघटना कृती समितीच्या वतीनेही निदर्शने करण्यात आली. गुडेवार यांची नियुक्ती होऊन एक वर्षही झाले नाही तोवर त्यांची तडकाफडकी बदली करण्याची ही दुसरी वेळ आहे. गुडेवार यांची बदली म्हणजे सोलापूरकरांच्या अपेक्षांना धक्का देणारी बाब आहे त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अन्यथा दि.२३ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला आहे. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फॅक्सद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.