दोन दिवसाला घडामोडी कळवा; पवारांनी दिले सोलापुरातील नेत्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:01 PM2019-04-05T14:01:10+5:302019-04-05T14:09:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर लक्ष ठेवले आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर लक्ष ठेवले आहे. सोलापूर मतदारसंघात घडणाºया घडामोडींचा अहवाल दर दोन दिवसाला पाठवा, असे आदेशही त्यांनी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांना दिले आहेत.
शरद पवार यांनी बुधवारी शहरात दोन सभा घेतल्या. यंत्रमाग धारकांसोबत बैठक घेतली. राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या बैठकीत त्यांनी माढा मतदारसंघात येणाºया तालुक्यातील नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत धनगर आरक्षण, मुस्लीम व मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार याबाबत भाष्य केले होते.
माढा मतदारसंघातील प्रचारात राष्ट्रवादीचे नेते या मुद्यांवर चर्चा घडवून आणणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पवारांनी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी रणनितीवर चर्चा केल्याचे समजते.
शहरातील लोकांकडून जाणून घेतला कौल
- पवार बुधवारी रात्री सोलापूर मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी परत जाताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत काही शंका असतील तर त्या आताच सांगा, असे सांगून शहराच्या विविध भागातून होणारे मतदान आणि शहरवासीयांची भूमिका याबद्दलही माहिती घेतली. शहरातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी पवारांना भेटायला आली होती. या मंडळींकडून पवारांनी शहराचा कौलही जाणून घेतला. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाºयांनी सोलापुरात घडणाºया घडामोडींचा अहवाल माझ्यापर्यंत येईल, अशी व्यवस्था करावी, असेही पवारांनी सांगितल्याचे सांगण्यात आले.