सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती
By Appasaheb.patil | Updated: July 19, 2023 15:26 IST2023-07-19T15:25:41+5:302023-07-19T15:26:08+5:30
पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात.

सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती
सोलापूर : उघड्या फ्यूज पेट्या, दरवाजे, तुटलेल्या तारा इत्यादींची व्हाट्सॲपवर नागरिकांकडून महावितरणला माहिती मिळाल्यावर त्वरीत दुरुस्ती करून होणारे अपघात टाळता यावे यासाठी मंडळ स्तरावर व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले असून ग्राहकांनी त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. तारा तुटणे, तारांना झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी व इतर कारणांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणाला व्हाट्सॲप किंवा एसएमएस द्वारे माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांना व्हाट्सॲप नंबरवर फोन करून तत्काळ माहिती देता येईल.
हा आहे सोलापूरसाठी व्हॉटसअप नंबर
- पुणे परिमंडळ अंतर्गत रास्तापेठ मंडळ, गणेशखिंड मंडळ व पुणे ग्रामीण मंडळ यासाठी व्हाट्सॲप नंबर 7875767123
- कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर मंडळासाठी 7875769103
- सांगली मंडळ यासाठी 7875769449 तसेच
- बारामती परिमंडळ अंतर्गत बारामती मंडळ यासाठी 7875768074
- सोलापूर करिता 9029140455
- सातारा मंडळासाठी 9029168554
व्हाॅट्सअप नसल्यास एसएमएस करा..
ज्या नागरिकांकडे व्हाॅट्सअप नाहीत त्यांनी 'एसएमएस'द्वारे तक्रार केल्यास त्याचेही निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी समन्वयक म्हणून मंडळ कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) व विभागीय कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.