पंतप्रधानांसह रेल्वे अन् कृषिमंत्र्यांवर आचारसंहिता भंग गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:29+5:302021-01-08T05:10:29+5:30
ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ...
ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आदींनी २८ डिसेंबर २०२० रोजी सांगोला (जि. सोलापूर) येथे आदर्श आचारसंहितेचा उघडपणे भंग करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करण्यासाठी किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ कार्यक्रम दिमाखात साजरा केला.
हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा उघडपणे भंगच नव्हे, तर सत्तेच्या जोरावर निवडणूक आचारसंहिता पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे, असा आक्षेप घेतला आहे. यासाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, कृषिमंत्री यांच्यासह संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करावी, असा तक्रारी अर्ज किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
-----
या आधारे केली तक्रार
आदर्श आचारसंहिता परिशिष्ट - २ मधील कलम १०, परिशिष्ट -३ मधील भाग-२ (१) परिशिष्ट मधील कलम -७, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांमधील कलम -७, नुकतेच म्हणजे ११ ते १७ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने पारित केलेले आदेश आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निश्चित केलेले सिद्धांत या आधारे तक्रारी अर्ज दाखल केल्याचे कदम यांनी सांगितले.