लक्षणे असलेल्या रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह; आता ॲंटीजेन टेस्टच्या किटचीच टेस्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 12:52 PM2021-04-29T12:52:03+5:302021-04-29T12:52:09+5:30
रुग्णांचा सूर : नवीन किटमुळे निर्माण होत आहेत समस्या
सोलापूर : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून रुग्ण पॉझिटिव्ह व निगेटिव्ह ओळखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ॲंटीजेन किटचा वापर सुरू झाला. लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे किस्से उघड झाल्यावर संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळेच्या चाचण्या सुरू झाल्या. पण सध्या आरोग्य विभागामार्फत वापरण्यात येणारे ॲंटीजेन किट तीन तीन वापरले तरी अहवाल येत नसल्याने डॉक्टरच हैराण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाल्यावर कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी ॲंटीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्या बरोबरीनेच प्रयोगशाळेच्या ही चाचण्या घेण्यात येत आहेत. पण सध्या आरोग्य विभागाने चाचणी करण्यासाठी दिलेल्या ॲंटीजेन किटचीच पाणी किंवा सॅनिटायझर टाकून चाचणी करा असा आग्रह रुग्ण धरत आहेत. त्याचे कारणही तसेच गंभीर असल्याचे दिसून येत आहे. एकतर ही चाचणी घेण्यासाठी रुग्णाच्या नाकात खोलवर स्टीक घालावी लागते. या क्रियेला रुग्ण घाबरतात. पण तीन वेळा स्वॅब घेऊनही चाचणी पट्टीवर निकाल येत नसल्याने डॉक्टर मंडळी हैराण होत आहेत.
अशी आहे सध्याची किट
आरोग्य विभागातर्फे ॲंटीजेन चाचणी करण्यासाठी देण्यात आलेल्या किटमध्ये बदल झाला आहे. सध्या डॉक्टरांना स्वॅब घेण्याच्या स्टीकबरोबर जेलने भरलेली बाटली दिली जाते. चाचणी करताना हे जेल ड्रॅापरमध्ये ओतावे लागते. त्यानंतर स्वॅब घेतलेली स्टीक या ड्रॉपरमध्ये बुडवावी लागते. त्यानंतर त्यावर रिकामी कुपी बसवून आतील द्रावण काचेच्या चाचणी पट्टीवर ओतावे लागते. बायोकार्डवर कंट्रोल लाईन व टेस्ट लाईन अशा दोन रेषा असतात. द्रावण ओतल्यावर आधी कंट्रोल लाईन लाल होते. त्यानंतर टेस्ट लाईन आली तर रुग्ण पॉझिटिव्ह समजला जातो. पण अर्धा तास गेला तरी दोन्ही लाईन येत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांदा स्वॅब घ्यावा लागत असल्याने रुग्ण संताप व्यक्त करीत आहेत.
आधीचे किट होते सोपे
पहिल्या लाटेच्या वेळी वापरण्यात आलेले किट सुलभ पद्धतीने हाताळता येत होते. स्वॅब घेण्याच्या स्टिकमध्येच असलेल्या ट्युबमध्ये जेल भरलेले असायचे. स्वॅब घेतल्यानंतर स्टीकवरील पट्टी काढली की द्रावण सहज कुपीत भरता येत होते. त्यानंतर हे द्रावण स्लाईडवर दोन थेंब टाकले तरी मिनिटभरात रिझल्ट येत होता. पण आता किट बदलल्यालने लोक किटचीच परीक्षा करण्याचा डॉक्टरांकडे आग्रह क़रताना दिसत आहेत. या किटबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चाचणीमुळे संशयित रुग्ण पाणी किंवा सॅनिटायझर टाकून हे किट खरे आहे काय याची आम्हाला चाचणी करून दाखवा असे भांडत करीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे हाफकीन इन्स्टिट्यूटचे किट खरेदी केले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लाख चाचण्या झाल्या आहेत. यात ॲंटीजेनची संख्या मोठी आहे. किटबाबत एकाही डॉक्टरांंनी तक्रार केलेली नाही. रुग्णांच्या तक्रारीची खातरजमा करू.
डाॅ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक