कत्तलखान्यात डांबून ठेवण्यात आलेल्या ३२ जनावरांची सुटका
By संताजी शिंदे | Published: March 4, 2024 08:10 PM2024-03-04T20:10:15+5:302024-03-04T20:10:27+5:30
जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते.
सोलापूर : शास्त्रीनगर येथील एका कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी डांबून ठेवण्यात आलेल्या ३२ जनावरांची सुटका केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कत्तलखान्यात शेतीस उपयुक्त असलेले जनावरे बेकायदा ठेवण्यात आल्याची माहिती शहरातील गोरक्षकांना मिळाली होती. गोरक्षकांनी ही माहिती सदर बाजार पोलिस स्टेशनचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांना दिली. पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका कत्तलखर्यावर छापा टाकला. कत्तलखान्यात अडगळीच्या ठिकाणी शेती उपयुक्त गोवंश डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १५ देशी खिल्लार, १७ जनावरे मिळून आले. जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते. अनेक जनावरांना इजा झाली होती.
जनावरांना अनेक दिवसापासून काहीही खायला प्यायला न देता ठेवण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्याशी संपर्क साधून कोंडवाडा वाहन घटनास्थळी बोलवण्यात आले. घटनास्थळावरून सर्व जनावरे अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस अधिकारी विठ्ठल काळजे, मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी, गोरक्षक पवनकुमार कोमटी, मानद पशुकल्याण अधिकारी प्रशांत परदेशी तसेच बजरंग दलातील सर्व गोरक्षक व अहिंसा गोशाळेचे सहकार्य लाभले.