कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका
By संताजी शिंदे | Published: June 30, 2023 05:39 PM2023-06-30T17:39:46+5:302023-06-30T17:40:08+5:30
चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.
सोलापूर : अक्कलकोट येथे कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका करण्यात आली. अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्राच्या पाठीमागे राजीव नगर येथील कत्तलखान्यात जनावरे ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना व पोलिसांना माहिती कळवून कत्तलखान्यावर छापा टाकला, तेव्हां ५८ ते ६० जनावरे आढळून आले. चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.
एका खोलीमध्ये चमड्याचा ढीग होता, त्याच ठिकाणी जनावरांच्या कत्तलीसाठी लागणारे शस्त्रे ठेवण्यात आले होते. दुसऱ्या खोलीत हाडाचा शिंगाचा सापळा आढळून आला. जनावरे चारापाण्यासाठी तरफडत होत्या. कार्यकर्त्यांनी तात्काळ तेथे चार आणून टाकला. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेतली, टेम्पो मागवुन गोरक्षकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मानक पशू कल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी सर्व जनावरे अंहिसा गोशाळात पाठवून दिले. कामगिरी यशस्वी करण्यासाठी भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे, श्रीराम जन्मोत्सव समिती अक्कलकोट धनराज पाटील, वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.