सोलापुरात तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकलेल्या मुक्या जीवाची सुटका
By विलास जळकोटकर | Published: May 4, 2023 05:26 PM2023-05-04T17:26:54+5:302023-05-04T17:30:52+5:30
सोलापूर- पुणे नाका,अवंती नगर येथील तरुण सागर या पाच मजली अपार्टमेंटमध्ये पारवा पक्षी घरात येऊ नये यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घराला खिडकी बाहेर जाळी लावलेली होती.
सोलापूर : उन्हामुळे पक्ष्यांचे चारा आणि पाण्यासाठी हाल होत आहेत. अशाच एका चारा शोधण्यासाठी गेलेला शिक्रा पक्षी अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या जाळीत अडकला. तीन दिवसांपासून त्याची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. अखेर वन्यजीवप्रेमींना खबर मिळाली अन् त्याची सुटका झाली. अवंतीनगर येथील तरुणसागर अपार्टमेंटमध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सोलापूर- पुणे नाका,अवंती नगर येथील तरुण सागर या पाच मजली अपार्टमेंटमध्ये पारवा पक्षी घरात येऊ नये यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घराला खिडकी बाहेर जाळी लावलेली होती. मात्र सध्या ते घर बंद होते. खिडकीच्या जाळीवरील एका फटीतून तीन शिक्रा पक्षी आत गेले परंतु त्याला बाहेर पडता येईना. दोघांनी केलेल्या प्रयत्नात त्यांना तडफडून मृत्यू झाला. एक पक्षी तीन दिवस अडकून पडला होता. जीव वाचवण्यासाठी त्याची फडफड सुरु होती.
हा प्रकार स्थानिक नागरिकांना दिसून आला. याबद्दल त्यांनी मोबाईलवरुन वन्यजीव प्रेमींना कळवले. घटनास्थळी वन्यजीव प्रेमी प्रविण जेऊरे, अजय हिरेमठ, तेजस म्हेत्रे , ॲनिमलचे डॉ. अनिकेत नावकर, निखिल बनसोडे , भीमाशंकर विजापूरे पोहचले. आणि त्याची पाचव्या मजल्यावर चढून रेस्क्यूद्वारे जीवनदान दिले.
अशी राबवली रेस्क्यू मोहीम'
घर बंद असल्याने खिडकीपर्यंत रेस्क्यू कीटद्वारे पाचव्या मजल्यावरवरून तिसऱ्या मजल्यावर भीमाशंकर विजापूरे व प्रवीण जेऊरे उतरले. कटरचा वापर करून जाळीचा थोडा भाग कट करून शिताफीने त्या जिवंत शिक्रा पक्ष्याला बाहेर काढले. सोबतच्या दोन मृत पक्ष्याला बाहेर काढण्यात आले. जिवंत पक्षी खूपच अशक्त झाल्याने त्याच्यावर ॲनिमल राहतकडे वैद्यकीय उपचार करुन रविवारी निसर्गात सानिध्यात सोडण्यात आले.