संशोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डाळिंब बागांची अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:38+5:302021-09-26T04:24:38+5:30
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे शनिवारी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले असता अजनाळे (ता. सांगोला) येथे आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. ...
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे शनिवारी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले असता अजनाळे (ता. सांगोला) येथे आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, भाऊसाहेब रूपनर, प्रा. पी. सी. झपके, अनिल मोटे, सभापती राणी कोळवले, कृषी संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,
शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, पं.स. सदस्य सुभाष इंगोले, तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, सुनील भोरे, शिवाजी गायकवाड, विजय येलपले, विजय पवार, तुकाराम आळसुंदकर, चंद्रकांत चौगुले, आनंद घोंगडे, चंद्रकांत येलपले, सरपंच विजय खांडेकर, अभिजित नलवडे, गोरख घाडगे, विष्णू देशमुख उपस्थित होते.
दादाजी भुसे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये अनेक डाळिंब बागांचे तेलकट डागामुळे तसेच मका पिकासह अनेक पिकांचे नुकसान झाल्याचे रस्त्यातून येताना दिसून आले. अजूनही शेतात पाणी साचलेले आहे. या सर्व पिकांचे पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांना सोबत घेऊन आलोय असे सांगितले. कृषि विम्याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा तुमच्या कंपन्यांना महाविकास आघाडी सरकार हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, अजनाळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी विजय येलपले यांनी डाळिंब व रोगाबाबत कृषिमंत्र्यांना निवेदन द्यावे, अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यावेळी आमदार पाटील यांनी मी मंत्र्यांना निवेदन देण्याऐवजी त्यांनाच थेट शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन येतो, असा शब्द दिला होता. आज कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याच्या थेट बांधावर आणून खरा केला असे सांगितले.
दीपक साळुंखे म्हणाले की, सध्या हवामानाचे ऋतू बदलल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. डाळिंबाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्यात मध्यवर्ती प्रयोगशाळा होण्यासाठी त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक पुणे विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार यांनी केले. जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.
कृषिमंत्र्यांनी घेतला ड्रॅगन फ्रूटचा आस्वाद
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रारंभी बामणी येथील माजी सैनिक सदाशिव साळुंके यांच्या ड्रॅगन फ्रूट फळबागेला भेट दिली. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे शेती उद्योगात प्रगती साधत आहेत. डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ज्याची जगभर ओळख आहे. अशा सांगोला तालुक्यात शेतकरी यशस्वीरीत्या ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतो, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ‘ड्रॅगन फ्रूट्स’चा आस्वाद घेतला.
केंद्र सरकारवर बोचरी टीका
गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने आपली जबाबदारी १२.५ टक्के मर्यादित ठेवल्यामुळे विमा योजनेतून त्यांनी काढता पाय घेतला की काय? अशी बोचरी टीका त्यांनी केली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पोहोचवले जाईल. त्याचबरोबर मागेल त्याला शेततळे यासाठी ५५ कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे. १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग केले जाईल. सांगोल्यात शेतकरी भवन झाले पाहिजे, या मताशी मी सहमत आहे, असेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ :::::::::::::::::
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगोला दौऱ्याप्रसंगी अजनाळे येथे शेतकरी परिसंवादात मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रा. पी. सी. झपके, बसवराज बिराजदार, बाळासाहेब शिंदे, संभाजी शिंदे व अन्य.