सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
By admin | Published: March 24, 2017 02:49 PM2017-03-24T14:49:20+5:302017-03-24T14:49:20+5:30
सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
सोलापूर: आम्ही जनतेसोबत आहोत... आमचा लढा सरकारच्या उदासीन धोरणाविरुद्ध आहे रुग्णांविरुद्ध नव्हे.. रुग्णांसाठी सोयीसुविधांसाठी अपुरी साहित्य सामुग्री त्यातून डॉक्टर- रुग्ण, नातलगांमध्ये निर्माण होणारे तणाव आणि कटूतेचे वातावरण जनतेसमोर दर्शविण्यासाठी तीन दिवसांपासून संपावर असलेल्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर पथनाट्यातून हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर संप सुरु आहे. यासंबंधी मार्डने संप मागे घेतल्याचे वृत्त सर्वत्र झळकत असताना सोलापुरातील निवासी डॉक्टरांचा मात्र आजही दिवसभर संप सुरु होता. दुपारी १२ च्या सुमारास डॉ. पंकज नंदागवळी यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर पथनाट्यातून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. सकाळी निवासी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर पथनाट्य सादर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली; मात्र अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी संबंधित ११२ डॉक्टरांचे निलंबन केल्यामुळे परवानगी नाकारली. यामुळे डॉक्टरांनी शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर आपले आंदोलन छेडून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध केल्याचे डॉ. पंकज नंदागवळी यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
आमचा लढा हा शांततेच्या मार्गाने असून, त्याचे प्रतीक म्हणून सायंकाळी रुग्णालयातील बी ब्लॉक ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत कँडल मार्च केल्याचे डॉ. प्रदीप हुलके यांनी स्पष्ट केले.
यावेळी समन्वयक डॉ. पंकज नंदागवळी, डॉ. प्रफुल्ल हुलके, डॉ. श्याम गिरी, डॉ. श्रद्धा महाडिक, डॉ. जयदीप दळवी, डॉ. बालाजी माने, डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)