चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाला आरक्षण हेच आमचे लक्ष, झळकले बॅनर
By दिपक दुपारगुडे | Published: October 24, 2023 05:13 PM2023-10-24T17:13:27+5:302023-10-24T17:14:32+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेतेमंडळीही ठोस भूमिका घेत नाहीत.
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यात खेडभोसे येथे सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदचा ठराव करून ‘चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, जो समाजाला मनात नाही, त्याला समाज मानत नाही, अशा आशयाचे फलक गावात लावण्यात आले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेतेमंडळीही ठोस भूमिका घेत नाहीत. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या बैठकीत, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खेडभोसे गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला. प्रवेशबंदी असतानाही एखाद्या राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्यास, त्यानंतर होणाऱ्या मानापमानास तो नेता स्वतः जबाबदार असेल, असा सूचक इशाराही यावेळी देण्यात आला.