जिल्हा काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र सुरू
By admin | Published: May 20, 2014 12:38 AM2014-05-20T00:38:42+5:302014-05-20T00:38:42+5:30
नैतिक जबाबदारी: बाळासाहेब शेळके यांचा राजीनामा
दक्षिण सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे़ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला़ काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव शेळके यांच्या जिव्हारी लागला़ विशेषत: दक्षिण सोलापूर तालुक्यातून भाजप उमेदवाराला २७,८२१ इतके विक्रमी मताधिक्य मिळाले़ त्यामुळे निकालापासून शेळके काहीसे उदास होते़ त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नाराजी दिसून येत होती़ आज सकाळी त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना फॅक्सद्वारे पाठविले़ शेळके यांनी २००८ साली आनंदराव देवकते यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती़ त्यांच्या कालावधीत २००९ सालची लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळाले़ कमळे गुरुजीनंतर शेळके यांनी पक्षासाठी पूर्णवेळ दिला होता़ राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी पक्षासाठी जिल्हाभर भ्रमंती केली़ काँग्रेसपासून दुरावलेल्या अनेकांना पक्षाच्या प्रवाहात आणले़ लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला़ कोणाशीही चर्चा न करता त्यांनी थेट आपला राजीनामा सकाळी फॅक्सद्वारे श्रेष्ठींकडे पाठविला़
-----------------------
दक्षिणमधून भाजपला मताधिक्य दक्षिण सोलापूर तालुक्यातून भाजप उमेदवाराला २७,८२१ इतके विक्रमी मताधिक्य मिळाले़ त्यामुळे शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री यांना पाठविला.
-----------------------------
काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी शक्य तितके काम केले़ सुशीलकुमार शिंदे यांना निवडून आणण्यात मी कमी पडलो़ मला पक्षासाठी आणि शिंदे यांच्यासाठी काम करावयाचे होते़ आता कोणासाठी काम करायचे? त्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा, म्हणून निर्णय घेतला़ - बाळासाहेब शेळके जिल्हाध्यक्ष, काँग्रेस