सचिव निवडीचा ठराव, सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:17+5:302021-07-14T04:26:17+5:30
करमाळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे. ...
करमाळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशामुळे विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडेच सचिव पदाचा भार राहणार आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे. यामुळे सभापतींसह बागल गटाला जबर धक्का बसला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठता व कायद्यातील तरतुदीनुसार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे पदभार सोपविला. परंतु बाजार समितीचे सभापती व बागल गटाला हा पदभार क्षीरसागर यांच्याऐवजी पाटणे यांच्याकडे सोपवायचा होता. त्यामुळे त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली. २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत समसमान मते पडून सभापतींच्या निर्णायक मताच्याआधारे पाटणेंचा ठराव मंजूर केला. मात्र या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी कायद्यातील तरतुदी, नियम, अधिनियम, कर्मचारी सेवानियम आदींबाबत सर्व सदस्यांना अवगत करून तशी नोंद इतिवृत्तामध्ये केली.
दरम्यान, क्षीरसागर यांनी सभापतींच्या पूर्वीच्या आदेशाविरोधात अपील दाखल केले असल्याने ही बाब न्यायप्रवीष्ट व प्रलंबित असल्याचे सांगत व तो ठराव सेवाज्येष्ठता व पात्रतेवर अन्यायकारक असून चार्ज देणार नसल्याची भूमिका घेतली.
या प्रकरणात क्षीरसागर यांच्यावतीने ॲड. अभय इनामदार, सभापतींच्यावतीने ॲड. सोमण, तर पाटणे यांच्यावतीने ॲड. तोष्णीवाल, राऊत यांनी काम पाहिले.
----
अपिलावरील सुनावणीसाठी मागितली मुदत
तातडीने ठरावाच्या विरोधात देखील दुसरे अपील दाखल केले. यावर ८ जुलै रोजी पणन संचालकांसमोर सुनावणी झाली. यात क्षीरसागर यांनी मागितलेला स्थगिती अर्ज पणन संचालक सतीश सोनी यांनी मंजूर करत, सभापतींचा आदेश व बाजार समितीच्या ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. यामुळे क्षीरसागर यांच्याकडेच सचिव पदाचा चार्ज कायम राहणार आहे. सभापतींचे विधीज्ज्ञ यांनी अपिलावरील सुनावणीत म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली.
----
माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पाठबळ, कर्मचारी, व्यापारी बांधव व शेतकऱ्यांची साथ असल्याने न्यायाची लढाई निश्चितपणे जिंकणार आहोत. कायदा व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायासाठी सामूहिकपणे, टोकाचा संघर्ष करण्याची तयारी आहे.
- विठ्ठल क्षीरसागर
प्रभारी सचिव, बाजार समिती