सेवानिवृत्तावर क्रीडा समन्वयकाची जबाबदारी; तक्रारीनंतर क्रीडा विभागाने केली नेमणूक रद्द
By Appasaheb.patil | Published: August 25, 2023 01:17 PM2023-08-25T13:17:21+5:302023-08-25T13:17:55+5:30
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : करमाळा तालुका क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेसाठी सेवानिवृत्त शिक्षकाची क्रीडा समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. याबाबत शिक्षक भारती संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर मुकुंद साळुंखे यांची नेमणूक रद्द करून स्पर्धेच्या क्रीडा समन्वयकपदी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळ्याचे राम काळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यात चालू असणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा विभागाकडून केले जाते. या क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून मुकुंद साळुंखे यांची नेमणूक क्रीडा विभाग यांनी केली होती. ही नेमणूक करताना साळुंखे यांनी आपण सेवानिवृत्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली नव्हती. या नेमणुकीस शिक्षक भारती संघटना करमाळा यांनी आक्षेप नोंदवला होता. मुकुंद साळुंखे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांना क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहण्याचे अधिकार नाहीत, ही भूमिका शिक्षक भारतीने तक्रारीत मांडली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी मोरे यांनी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्याकडे मुकुंद साळुंखे यांची नेमणूक रद्द करून नवीन क्रीडा समन्वयक यांच्या नेमणुकीचे पत्र दिले.