'रेस्ट'हाऊस कॅन्सल; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निघाले थेट अक्कलकोटच्या बांधावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:01 AM2020-10-19T10:01:17+5:302020-10-19T10:02:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री फ्रेश होण्यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जाणार होते. परंतु, विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला ताफा शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्याचे फर्मान सोडले. शासकीय ताफा अक्कलकोट तालुक्याच्या दिशेने रवाना झाला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीकर, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊत आदी हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांची जुजबी चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे असे सांगून ताफा अक्कलकोटच्या दिशेने निघण्याचे आदेश पोलिसांना दिले.