सोलापूर विद्यापीठातील ४५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या नऊ दिवसात
By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 16, 2023 02:08 PM2023-07-16T14:08:45+5:302023-07-16T14:08:51+5:30
७ जुलैला शेवटचा पेपर झाला असून आज (रविवार) १६ जुलैला परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सोमवारी, १७ जुलै दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. ७ जुलैला शेवटचा पेपर झाला असून आज (रविवार) १६ जुलैला परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच सात दिवसांच्या आत उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊन नऊ दिवसात निकाल जाहीर होत आहे. बीए, बीकॉम, बीएससी यासह इतर अभ्यासक्रमाच्या ४५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल दोन दिवसात जाहीर होईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत तसेच प्र- कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून मार्च-एप्रिल २०२३ च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व परीक्षा विभागाची टीम परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी रात्रंदिवस उत्तरपत्रिकांची तपासणी व निकाल लावण्यासाठी काम करीत आहे. यासाठी कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय टीमचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.