चौकशीसाठी सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांचे खेटे
By admin | Published: June 15, 2014 12:23 AM2014-06-15T00:23:00+5:302014-06-15T00:23:00+5:30
जिल्हा परिषद: सूर्यवंशी व आंबेडकर यांची चौकशी
सोलापूर: सेवेत असताना नियम डावलून वाट्टेल ते केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना आता खेटे मारण्याची वेळ आली आहे. खुर्चीवर असताना लोकांना तासन्तास ताटकळत ठेवणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी आता ताटकळावे लागत आहे.
सरकारी सेवा बजावताना चुकीच्या पद्धतीचे कामकाज करणे नक्कीच अडचणीचे ठरणारे असते. परंतु काही अधिकारी मोहापायी अशा फाईलवर सुट्टीच्या दिवशीही सह्या करतात. नियमाप्रमाणे असणाऱ्या फाईल निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांना रस नसतो. नियमाच्या फाईलवर सह्या करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात थरथर कापतात. परंतु बेकायदेशीर कामाच्या फाईल कधी हातावेगळ्या होतात ते समजूनही येत नाही. असाच प्रकार माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी महादेव आंबेडकर यांच्याबाबत झाला आहे. त्यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला हाताशी धरुन केवळ लिपिकाच्या सहीवर आपली सही करुन मान्यता दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या मान्यतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने चौकशी सुरू झाली आहे. चौकशीला बोलावल्याने ते शुक्रवारी जि.प. शिक्षण विभागात आले होते. त्याप्रमाणे प्राथमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी आबासाहेब सूर्यवंशी हेही बुधवार व गुरुवार असे दोन दिवस शिक्षण विभागात चौकशीच्या कामासाठी ठिय्या मारुन होते. शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ पोहोच न केलेल्या ठेकेदाराला बिल देण्यासाठी सूर्यवंशी यांनी मदत केल्याचे प्रकरण चौकशीसाठी सुरू आहे. नियमात असलेल्या कामासाठी पदाधिकारी व जनतेने कितीही आदळाआपट केली तरी दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोहापायी पाहिजे त्या फाईल निकाली काढल्या. आता चौकशीच्या कामासाठी त्यांना ताटकळत बसावे लागत आहे.
-------------------------------
साक्षीदाराच्या साक्षी नोंदणीचे काम सुरू आहे. आंबेडकरांच्या साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या. सूर्यवंशी यांच्या साक्षीदाराच्या साक्षी सुरू आहेत. साक्षीदाराला पत्रच गेली नसल्याने साक्षीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. जुलैमध्ये पुढील सुनावणी ठेवली आहे.
- बी.एस.हंगे
चौकशी अधिकारी