आघाडी सरकारचा परतीचा प्रवास पंढरपुरातून सुरू होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:34+5:302021-04-12T04:20:34+5:30
यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, खासदार सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत पारिचारक, माजी ...
यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, खासदार सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत पारिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे यांना सोबत घेऊन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गल्लोगल्ली आपल्या बैठकांचा जोर लावला आहे. त्यांनी पंढरपूर शहरात व्यापारी, लायन्स, जायंटस्, ‘रोटरी’सह स्वयंसेवी संस्थांशी संवाद, लोकप्रतिनिधी-पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या गाठीभेटी, नेत्यांची नाराजी काढण्याचे काम खासदार रणजितसिंह सध्या करत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची सर्व सूत्रे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हातात देण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतलेला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. माजी मंत्री श्री बाळा भेगडे यांनी प्रचारयंत्रणाचे सूत्र हाती घेत नियोजन करून संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सभा
निवडणूक निश्चित झाल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नियोजनबद्ध प्रचार करत मतदारसंघावर पकड मिळविली आहे. भाजपच्या विविध आघाडी, सेलच्या प्रमुखांनी स्थानिक पातळीवर प्रचाराचे योग्य नियोजन करत आघाडी सरकारविरोधात रान तापविले असताना विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मतदारसंघाची प्रमुख जबाबदारी असलेले माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह भाजपचे अनेक माजी मंत्री या मतदारसंघांत प्रचारात आघाडी सांभाळत आहेत. मात्र, शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या सभांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे कोण-कोण भाजपमध्ये प्रवेश करणार, किती संघटना पाठिंबा देणार याविषयीची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. प्रचाराच्या दृष्टीने सोमवार, मंगळवार महत्त्वाचे मानले जात आहेत.