उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या विभाजनात महसूलची ‘मनमानी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:25 PM2017-12-21T13:25:47+5:302017-12-21T13:30:50+5:30
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे.
अरुण बारसकर
सोलापूर दि २१ : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे. पुनर्रचनेत हाकेच्या अंतरावरील तिºहे व बेलाटीला स्वतंत्र मंडले सुचविली आहेत. एका मंडलात १६ हजार तर दुसºया मंडलात ३२ हजार लोकसंख्या असा विरोधाभास आहे.
उत्तर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत शहराच्या हद्दवाढीत सामावलेल्या ११ गावांचाही समावेश आहे. शिवाय शहराच्या काही भागांचाही समावेश असल्याने उत्तर तालुका तहसील कार्यालय ग्रामीण भागासाठी स्वतंत्र करण्याची मागणी आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाने उत्तर तहसील विभाजनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. नव्याने रचना करताना शहरासाठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती सुचवली असून ४० गावांसाठी स्वतंत्र तहसील कार्यालयाचा आराखडाही तयार केला आहे. मात्र अपर तहसीलदार हे तहसीलदारांच्या अखत्यारितच राहणार असल्याचे सांगण्यात आले. पुनर्रचना करताना २०११ ची जनगणना विचारात घेतली आहे.
--------------------
अपर तहसीलदारांचे कार्यक्षेत्र
- सध्या उत्तर तहसीलच्या अखत्यारित सोलापूर, शेळगी, तिºहे, मार्डी व वडाळा हे मंडल आहेत.
- नव्या रचनेत अपर तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात सोलापूर, शेळगी व मंडल अधिकारी सिटी सर्व्हे हे तीन मंडल राहणार आहेत.
- सोलापूर मंडलामध्ये मजरेवाडी, कसबे सोलापूर, नेहरूनगर, सलगरवाडी, बाळे, केगाव व शिवाजीनगर
- शेळगी मंडलामध्ये शेळगी, दहिटणे, सोरेगाव, प्रतापनगर, कुमठे, देगाव व बसवेश्वरनगर
---------------------
नवे ‘बेलाटी’ मंडल केले प्रस्तावित
महसूल खात्याने जुन्या तिºहे, वडाळा व मार्डी शिवाय नव्याने बेलाटी मंडल प्रस्तावित केले आहे. वडाळा मंडलात १० गावे, त्यांची लोकसंख्या ३१ हजार ४७८ इतकी तर मार्डी मंडलात ११ स्वतंत्र गावे व तरटगाव जोडले आहे. यामुळे मार्डी मंडलाची ३२ हजार इतकी लोकसंख्या झाली आहे. एकरुख मात्र बेलाटी मंडलाला जोडले आहे. बेलाटी मंडलात डोणगाव, नंदूर, कवठे, बेलाटी, हगलूर, हिप्परगा, एकरुख, खेड व कोंडीचा समावेश केला आहे.
--------------------
तर सोईचे झाले असते...
दक्षिण तालुका मतदारसंघाला जोडलेल्या व सीना नदीकाठच्या १० गावांची लोकसंख्या २६ हजार २४५ इतकी असून या गावांचा एक मंडल प्रस्तावित करता आला असता. मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या २४ गावांची लोकसंख्या ७९ हजार ५४९ इतकी असून याचे तीन मंडलात विभाजन केले असते तर प्रत्येक मंडलात २६ हजार ५१६ इतकी लोकसंख्या होते. मात्र प्रशासनाने १० गावात दोन मंडले करताना बेलाटीला तुळजापूर रोडलगतची कामे जोडण्याची किमया केली आहे.
----------------------
सहा गावांचे तिºहे तर ३२ हजारांचे मार्डी मंडल
- पुनर्रचनेत तिºहे मंडलात तिºहे, पाथरी, तेलगाव, हिरज, पाकणी व शिवणी ही गावे असून त्यांची लोकसंख्या १६ हजार ५३ इतकी होते.
- बेलाटी मंडलातील बेलाटी, डोणगाव, नंदूर, कवठे, हगलूर, हिप्परगा, एकरुख, खेड व कोंडी या गावांची २५ हजार ३१७ (एकरुख वगळून) इतकी लोकसंख्या आहे.
- वडाळा मंडलात वडाळा, गावडीदारफळ, रानमसले, नान्नज, वांगी, पडसाळी, कौठाळी, भागाईवाडी, कळमण व साखरेवाडी असून ३१ हजार ४७८ इतकी लोकसंख्या होते.
- मार्डी मंडलात भोगाव, बाणेगाव, कारंबा, गुळवंची, मार्डी, नरोटेवाडी, सेवालालनगर, होनसळ, तरटगाव, राळेरास, अकोलेकाटी व बीबीदारफळच्या ३२ हजार ९२६ (एकरुखसह) लोकसंख्येचा समावेश आहे.