Teachers day special; या गावाची ओळखच लय भारी; शिक्षकांनी घडविले शंभर अधिकारी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:46 PM2020-09-05T12:46:40+5:302020-09-05T12:46:47+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला आहे.
सचिन कांबळे
पंढरपूर : आमच्या सापटणे गावची लोकसंख्या २५०० मात्र गावात १०० हून अधिक अधिकारी आहेत. हे सर्व सुभाष साळुंखे गुरुजींमुळे घडले, असे गौरवोद्गार काढत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला आहे.
साळुंखे गुरुजींमुळे आयुष्याला आकार
सापटणे-टेंभुर्णी (ता. माढा) येथील झेडपीच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. तेथे सुभाष साळुंखे गुरुजींचा सहवास लाभला.एकदा शाळेची सहल पंढरपूरला आली होती. तेथे कैकाडी महाराज मठात आमचे नाव पुकारावे म्हणून खाऊला दिलेल्यापैकी १ रुपया देणगी दिली. त्यावर गुरुजी म्हणाले स्वकमाईने सामाजिक काम करावे. त्यांच्या विचारांमुळे आमच्या आयुष्याला आकार आला.
अन् जीवनाला कलाटणी मिळाली...
इयत्ता दुसरीमध्ये गुरुजींनी १५ आॅगस्ट रोजी भाषण करण्यासाठी माझी निवड केली. त्यांनीच भाषण लिहून दिले, हातवारे करून प्रभावी भाषण करायचे हे शिकवले. मात्र मला १५ आॅगस्टदिवशी दोन वाक्यानंतर बोलता येईना. ते पाहून मला त्यांनी एवढे बोलून मी भाषण संपवतो असे बोल म्हणून सांगितले. त्या वाक्यावर उपस्थितांनी खूप टाळ्या वाजवल्या. तेच भाषण २६ जानेवारीला केले. तेव्हापासून मला वाचनाची खूप सवय लागली. यामुळे मी अधिकारी झालो.
नित्यनेमाने रोज दुपारी गावातून फेरफटका
मी शिक्षण घेत असलेल्या शाळेची वेळ सकाळी ७ ते १०:३० नंतर दुपारी २ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत अशी होती. काही मुले सुटीच्या वेळेत विटी-दांडू, क्रिकेट व अन्य खेळ खेळत असत. मात्र आमच्या साळुंखे गुरुजींना रोज दुपारी एक वाजता गावातून फेरफटका मारण्याची सवय होती. यामुळे शाळेतील अधिक विद्यार्थी दुपारच्या सुटीच्या वेळेत देखील . शाळेत, मंदिर, समाज मंदिरात अभ्यास करत असत. काही वेळेला रविवारच्या सुटीदिवशी देखील गुरुजी येतात की काय अन् रागावतील की काय, अशी सर्वांना भीती वाटायची. गुरुजींच्या फेरफटक्यामुळे अनेकांना रोज अभ्यास करायची सवय लागली.
फुलांची माळ स्वत: गुंफली
तहसीलदार झाल्यानंतर मी गुरुजींची भेट घ्यायला गेलो होतो. तत्काळ त्यांनी विद्यार्र्थ्याला फुले आणायला पाठवले. त्यांनी स्वत: फुले गुंफून हार तयार केला. सर्व विद्यार्थ्यांसमोर माझा सत्कार केला. तुम्ही असेच मोठे व्हा, असे विद्यार्थ्यांना सांगितले. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.