गुरुजी अन् गावकऱ्यांची 'लयभारी युती', १७ लाख जमवून केली सायन्स वॉलची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:08 AM2022-02-03T08:08:34+5:302022-02-03T08:11:12+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमानुसार करमाळा तालुक्यात सायन्स वॉलची निर्मिती हे करण्यात आले आहे.
सोलापूर - करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 227 प्राथमिक शाळेत वॉल निर्मित्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी 17 लाख 4 हजार 600 रुपये खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यात आला. या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका सर्वात आघाडीवर आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमानुसार करमाळा तालुक्यात सायन्स वॉलची निर्मिती हे करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पाठपुरावा करून हे काम पूर्ण केले आहे. त्यांनी सर्व शाळांतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीशी भेटून या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षक व ग्रामस्थांनीही मोठे योगदान दिले. २२७ शाळांसाठी सायन्स वॉल निर्मितीसाठी एकूण १४ लाख ४ हजार ६०० रु. खर्च आला. त्यामध्ये लोकवर्गणीतून १० लाख २१ हजार ५०० रुपये, तर शिक्षक वर्गणीतून ६ लाख ८१ हजार रुपये जमा झाले.
तालुक्यातील शिक्षक व पालकांनी हा उपक्रम मोठ्या हिरिरीने परिपूर्ण केला आहे. एका आवाहनानुसार एवढी मदत जमली. सध्याच्या कठीण कालावधीत मदत देऊन एक चांगला उपक्रम राबविण्याचे काम शिक्षणप्रेमींनी केले आहे. या वॉलच्या माध्यमातून २८ वैज्ञानिकांचे छायाचित्र व त्यांचे जन्मदिवस साजरे केले. त्यांचे वैज्ञानिक शोध व सिद्धांत विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे काम यापुढेही यशस्वीपणे सुरू राहील, असे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाद्वारे २८ शास्त्रज्ञांचे फोटो व डिजिटल बॅनरच्या मदतीने सायन्स वाॅल तयार करण्यात आली. शास्त्रज्ञांची जयंती साजरी करीत असून, त्यावेळी विद्यार्थी एकाग्रतेने माहिती ऐकत आहेत. त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती निर्माण झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस मदत होईल.
- प्रफुल्लता सातपुते, मुख्याध्यापक खडकी, ता. करमाळा.