पंढरपुरातील श्रीमंत होळकर वाडा कात टाकतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:31+5:302021-05-31T04:17:31+5:30

पंढरपूर : आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।... असे माहात्म्य असणाऱ्या दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या ...

Rich Holkar from Pandharpur is cutting the castle ... | पंढरपुरातील श्रीमंत होळकर वाडा कात टाकतोय...

पंढरपुरातील श्रीमंत होळकर वाडा कात टाकतोय...

Next

पंढरपूर :

आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।...

असे माहात्म्य असणाऱ्या दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या भूवैकुंठ पंढरपुरास धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. मोठमोठ्या सरदारांचे वाडे पंढरपुरात तग धरून आहेत. काही वाडे इतिहासजमा झाले असले तरी प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणारा व अजूनही चंद्रभागेच्या तीरावर तग धरून असलेला पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील प्रमुख महाद्वार घाटावर बांधलेला चिरेबंदी वाडा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा श्रीमंत होळकर वाडा.

राजकारण, समाजकारण, धर्मकारण, न्यायकारण, अर्थकारण, जलसंवर्धन, पशु-पक्षी-वृक्ष संवर्धन आणि मानवता यांमध्ये विश्ववंद्य कार्य करणाऱ्या साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी २५२ वर्षांपूर्वी हा वाडा पंढरपूरमध्ये बांधला. तसे पाहता संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक भक्तांच्या सोयीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या खासगी खर्चातून १६०० वाडे बांधले. त्यातील पंढरपुरातील हा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला चिरेबंदी, घनगाव होळकर वाडा.

होळकर वाड्याची भव्य-दिव्यता तेवढीच आहे पण त्यातील बराचसा भाग जरा भग्नावस्थेकडे जातोय. काही भिंतींचे, दरवाजाचे पोपडे निघू लागलेत, काही ठिकाणी जमीन भुसभुशीत होऊ लागलीय, छताच्या लाकडांमध्ये काही पक्ष्यांनी घरटी केल्याने तेथील लाकडी भाग कमकुवत झाला आहे. या संपूर्ण होळकर वाड्याची दुरुस्ती करून पुन्हा एकदा या वाड्याला वैभवशाली परंपरा मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियंत्रणाखाली सन १७५४ मध्ये या वाड्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला. १३ वर्षे या वाड्याचे बांधकाम सुरू होते. वाड्यासाठी लागणारे सागाचे लाकूड मध्यप्रदेश राज्यातील जंगलामधून पंढरपूर येथे आणले होते. ही लाकडे नर्मदा नदीत टाकून नंतर ती गुजरात जवळच्या समुद्रात येत होती, नंतर रत्नागिरी समुद्राजवळ पोहचलेली ही लाकडे पाण्यातून बाहेर काढून हत्तीच्या पाठीवर टाकून पंढरपूर येथे आणली गेली. वाड्याचा वास्तूशांती समारंभ सन १७६७ ला चैत्र शुद्ध प्रतिपदा (पाडवा) दिनी झाला. हा वाडा बांधल्यानंतर एक वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य येथे होते. पंढरपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या बोहाळी या गावी त्यांच्या कार्यकाळात बांधलेली विहीर अजूनही चालू स्थितीत आहे. आता नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांची होळकर वाड्याचा कारभारी म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

---

वाड्यात हनुमान मंदिर बांधले...

चंद्रभागा घाटावर अहिल्यादेवी होळकर यांनी सण १७६८ मध्ये हा वाडा बांधून घेतला. या वाड्यात राम, लक्ष्मण, सीतामाई, भक्त हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराचे विश्वस्त आदित्य फत्तेपूरकर म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात शिवमंदिरे बांधली. पंढरपूरमध्ये मात्र होळकर वाड्यासाठी पाया खोदताना या ठिकाणी हनुमानाची मूर्ती सापडली. म्हणून या वाड्यात राममंदिर बांधण्यात आले. अन्यथा देशभरातील अहिल्यादेवींच्या इतर वाड्यात शिवमंदिरे बांधण्यात आली आहेत.

---

चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण या होळकर वाड्यात दिमाखात झाले. छोटी माँ सारखी हिंदी मालिका किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावरील मराठी मालिकेच्या माध्यमातून हा वाडा बऱ्यापैकी लोकांनी पाहिला आहे.

Web Title: Rich Holkar from Pandharpur is cutting the castle ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.