कृषी व्यवसायात वाढत्या इंधनदरामुळे भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:17+5:302021-03-13T04:40:17+5:30
सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाला गती मिळाल्यामुळे कृषी व्यवसायात पारंपरिक बैल व कष्टाच्या कामांची जागा यंत्राने घेतली. त्यामुळे साहजिकच पेट्रोल व ...
सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाला गती मिळाल्यामुळे कृषी व्यवसायात पारंपरिक बैल व कष्टाच्या कामांची जागा यंत्राने घेतली. त्यामुळे साहजिकच पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीचा मोठा फटका प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्राला बसला आहे. शेतीमाल बाजारभावाची अनिश्चितता, अपुरा मजूर, निसर्गाचा लहरीपणा, मिळणाऱ्या उत्पन्नात अनिश्चितता अशा अनेक गोष्टींमुळे कृषी व्यावसायिक तसेच वाहनचालक-मालक सर्वच घटक हतबल झाले आहेत.
कृषिक्षेत्रावर प्रत्येक गोष्टीचा ताण
कृषिक्षेत्रावर गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणाचा पगडा दिसत आहे. प्रामुख्याने पूर्व मशागतीत नांगरणी, पेरणी, आंतरमशागतीसह फळबाग फवारणी, मळणी या शेतीच्या प्रमुख कामांबरोबर, शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, अवजारे, वाहतूक, ऊस, दूध, फळांसह भाजीपाला अशा शेतीपूरक व्यावसायाशी निगडित आवश्यक साहित्याची वाहतूक करणारी यंत्रणा अशा शेतीच्या प्रत्येक गोष्टीचा भार कृषी व्यवसायावर पडत आहे.
कोट ::::::::::::::::::::::
यांत्रिकीकरणामुळे कृषिक्षेत्र झपाट्याने विकसित झाले. यांत्रिकीकरण शेतीला वरदान ठरत असतानाच मोठ्या प्रमाणात झालेली इंधन दरवाढ कृषी व्यवसायाला पुन्हा अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून कृषी व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे.
- दादासाहेब खरात
तालुकाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा