वाळू, सिमेंट, स्टिल, विटांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:26 PM2020-12-23T13:26:05+5:302020-12-23T13:26:20+5:30
लॉकडाऊननंतर बांधकामे वाढली; मजुरांची कमतरता
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : लॉकडाऊन काळात बंद पडलेली कामे अनलॉकनंतर वेगाने सुरू झाली. त्यामुळे अचानक बांधकाम साहित्यांची मागणी वाढल्याने किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या वाळू, विटा, स्टिलचे दर वाढल्याने गरिबांचे घरांचे स्वप्न महाग होतानाचे चित्र दिसत आहे.
बांधकाम व्यवसाय सुरू असला तरी त्यासाठी लागणारे साहित्य महागले आहे. सिमेंटच्या प्रती पोत्यामागे शंभर रुपये वाढ झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी सिमेंट बॅगचा दर २६५ ते २७० रुपये होता. आता हा दर ३७० रुपये झाला आहे. नदीतून वाळू उपशाला बंदी आहे. तसेच सिलिका वाळूची वाहतूकही बंद आहे. सध्या क्रश सॅन्डचा वापर सुरू आहे. परराज्यातून टाइल्स येतात. पण सध्या टाइल्सचा तुटवडा भासत आहे. प्लबिंग, इलेक्ट्रिक साहित्यामध्ये वाढ झालेली नाही. बिगारी, सेंट्रिंग, गिलाव करणारे, फरशी व अन्य कामे करणा-या कामगारांचे एका दिवसाचे पगारदेखील वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊननंतर सोलापूर शहर व जिल्ह्यात बांधकामांची संख्या वाढली. वाळू लिलाव बंद असल्यामुळे वाळूचे दर वाढले, माती महाग झाली त्यामुळे विटांच्या किमती वाढल्या, मागणी वाढल्यामुळे स्टिलचे दरही वाढले. बांधकाम मजुरांची मजुरीदेखील मोठी वाढली आहे.
- सागर दर्गो पाटील,
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?
पर्यावरण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील वाळूच्या लिलावाला स्थगिती दिली, त्यामुळे पूर्वी अगदी सहज मिळणारी वाळू आता मिळेनाशी झाली आहे. दरम्यान, जी वाळू मिळते तीही महाग मिळत आहे. शिवाय पूर्वी शेतात फुकटात मिळणारी माती आता विकत मिळत असल्याने विटांच्या किमतीत वाढ झाली आहे. सिमेंटचे भाव सातत्याने बदलत आहेत. त्याही कमी-अधिक प्रतीच्या सिमेंटमुळे सिमेंटचे दर वेगवेगळे आहेत.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. यामुळे बांधकाम साहित्य बनविण्याचे कारखाने व मशीन यादेखील बंद होत्या. सर्व मजुरांनी घरची वाट धरल्याने काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत होता. आजही या क्षेत्रात पन्नास टक्के मजुरांचा तुटवडा भासत आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्याने बरेच साहित्य इतर राज्यात अडकून पडले होते. सोलापुरात बांधकाम साहित्याची मागणी वाढली आहे; परंतु त्या तुलनेत बांधकाम साहित्याचा पुरवठा कमी होत आहे.