ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:03 IST2025-02-16T15:02:55+5:302025-02-16T15:03:29+5:30
गंभीर जखमी झालेल्या ऋतुजावर सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.

ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार
वैराग : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात ३१ जानेवारी रोजी गंभीर जखमी झालेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ऋतुजा अजित मोहिते (वय १९, रा. वैराग) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऋतुजाची १५ दिवसांपासून मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली.
३१ जानेवारी रोजी ऋतुजा ही तिच्या काकांसोबत घराकडे निघाली होती. वैराग परिसरात हिंगणी रोडवर ट्रॅक्टर आणि मोटारसायकल या दोन वाहनांचा अपघात झाला होता. यावेळी ऋतुजा हिच्या उजव्या मांडीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले, तर डावा कान तुटून पडला होता. गंभीर जखमी झालेल्या ऋतुजावर सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. अखेर १५ जानेवारी रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
ऋतुजाच्या मृत्यूस कारणीभूत कोण ?
वैराग शहरामध्ये बेशिस्त वाहनचालक, रस्त्याच्या दोन्ही या बाजूला तसेच रस्त्याच्या मधोमध वाढलेले अतिक्रमण यामुळेच ऋतुजाचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. हिंगणी रोड हा तर मृत्यूचा सापळा झाला आहे. त्याचबरोबर जुना तीन नंबर नाका, मारुती मंदिर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. दुकानाच्या समोर आडव्या-तिडव्या लावलेल्या मोटारसायकल, दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेले अतिक्रमण याकडे नगरपंचायत व पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे अपघातात वाढ झाली आहे. पुन्हा एखाद्या अपघातात कोणाचा तरी मृत्यू होण्याअगोदर पोलिस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे. ऋतुजाचा मृत्यूने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.