ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:01+5:302021-09-19T04:23:01+5:30

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि ...

The river of knowledge will reach the last element! | ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

googlenewsNext

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि डिजिटल वापराच्या बाबतीत आम्ही भारतीय जागतिकस्तरावर वरच्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच भारतासह वैश्विक शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली का, हा प्रश्नच आहे; परंतु वास्तविकता तसे नाही. खरे पाहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोने जाहीर केल्यानुसार सन १९६६ पासून ८ सप्टेंबर हा ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे होय. २०२१ या वर्षासाठी ‘मानवकेंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन संकुचित करणे’ हे घोषवाक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविणे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.

व्यक्तीला समजून लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता होय. भारतासारख्या विकसनशील देशात दारिद्र्य निर्मूलनापासून ते आर्थिक आणि सामाजिक समानतेद्वारे चांगले जीवनमान उपभोगण्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा पाया विस्तारणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक साक्षरता असलेले देश प्रगत, तर सर्वात कमी साक्षरता असणारे देश अप्रगत आहेत.

भारतात, १९५१ मध्ये एकूण १८.३३ टक्के लोक साक्षर होते. त्यापैकी २७.१६ टक्के पुरुष आणि केवळ ८.८६ टक्के स्त्रिया साक्षर होत्या. साक्षरतेच्या बाबतीत सरकारने सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, राजीव गांधी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, मध्यान्न भोजन इत्यादींचा परिणाम म्हणून, २०११ च्या शिरगणतीनुसार एकूण साक्षरता ७४.०४ टक्के असून, पुरुष व स्त्री साक्षरता अनुक्रमे ८२.१४ टक्के व ६५.५ टक्के वाढली. देशात सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यात असून, सर्वात कमी बिहार राज्यात आहे. म्हणजेच, स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही आपण अद्यापही १०० टक्के साक्षरता साध्य करू शकलो नाही हेच वास्तव.

आधुनिक जीवनशैलीचा विचार करता केवळ अक्षर साक्षरता महत्त्वाची नाही, तर सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ‘आरोग्य साक्षरता’ किती महत्त्वाची आहे, ही बाब भारतासह जगातील सर्वच देशात अधोरेखित झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘सेबी’ आर्थिक अर्थात गुंतवणूक साक्षरता या विषयावर देशभर कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे लोकांना अर्थ साक्षरतेविषयी जागरूक करत आहे. आज संपूर्ण मानवजातीला ‘मानवी मूल्य’ आणि ‘वर्तणूक साक्षर’तेची नितांत गरज असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

एकंदरीत, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कायमस्वरूपी रामबाण औषध म्हणून साक्षरतेच्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिल्यास ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजात ‘निरक्षरता’ या शापातून मुक्त होईल.

- डॉ. राजाराम पाटील, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर

-----

Web Title: The river of knowledge will reach the last element!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.