सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:19 PM2020-09-21T13:19:29+5:302020-09-21T13:20:04+5:30
मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपुरात कडकडीत बंद
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे़ आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद ची हाक दिल्याने या बंद ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून संबंध जिल्ह्यात याचा परिणाम पहायला मिळत आहे.
दरम्यान, या सोलापूर जिल्हा बंद आंदोलनाला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली़ माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून देत आरक्षण स्थगिती निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़ आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका स्पष्ट करत कुर्डूवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर या बंदमध्ये फक्त सर्व दवाखाने व्यतिरिक्त सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्याने मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ करमाळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता़ यावेळी तहसिलदार, पोलिसांना निवेदन देण्यात आले़ टेंभुर्णीत बंद पाळण्यात आला होता़ कुसळंब चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या बंदचे ग्रामीण भागात लोण पोहोचले असून ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन सकल मराठा समाज्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कुर्डूवाडी येथे पंराडा चौकात चक्क जाम करीत अंदोलन करण्यात आले तर शहरातील व्यावसायिकांनी बंद ठेवून मराठा समाज्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तर बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती पुष्पहार अर्पण करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरले होते.