रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:59+5:302021-07-07T04:27:59+5:30
भीमानगर : आढेगांव ते टाकळी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असता, टाकळी येथील ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर ...
भीमानगर : आढेगांव ते टाकळी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असता, टाकळी येथील ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. निकृष्ट कामाचा जाब विचारला असता अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. ठेकेदारांकडून व्यवस्थित काम करण्याच्या आश्वासनानंतर अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी त्यांचा गांधीगिरीने सन्मान केला.
आढेगाव, वडवली, चांदज, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, रुई टाकळी, गारअकोले या सर्व गावांना मिळून कोंढारभाग असे संबोधले जाते. ठेकेदार हद्दीमध्ये खडीकरण न करता आहे त्याच रस्त्यावर डांबरीकरण करून निकृष्ट दर्जाचे काम करणे सुरू होते. या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या तक्रारी केल्यानंतर सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे यांना टाकळी, गारअकोले, आलेगाव खुर्द येथील नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. शेवटी निकृष्ट झालेली कामे पुन्हा व्यवस्थित केल्याशिवाय ठेकेदारांना सोडणार नाही, असा शब्द दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने कार्यकारी अभियंता मोरे, उपविभागीय अभियंता नाईकवाडी व शाखा अभियंता हेडगिरे यांचा शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार केला.
यावेळी पत्रकार विष्णू बिचकुले, अमोल देवकते, भाऊ पवार, हरिदास माने, भाऊ काळे, काकासाहेब पाटील, उद्धव केचे, दुर्योधन देवकते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
---
अधिकाऱ्यांची बोलती बंद
टाकळी येथील युवा कार्यकर्ते भाऊ काळे यांनी, आढेगाव व वडवली हद्दीमध्ये खडीकरण न करता आहे त्याच रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा ठेकेदाराचा घाट असल्याचे लक्षात आणून देताच अधिकाऱ्यांनी सारवासारव केली. तसेच गारअकोले रुई या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पाढा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला, तेव्हा अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.
----
फोटो : ०६ भीमानगर
कोंढारभाग रस्त्याची पाहणी करताना अधिकाऱ्यांच्या गाड्या अडविल्या.