अर्धवट कामांमुळे चिखलात फसले कुर्डूवाडीतील रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:18+5:302021-06-21T04:16:18+5:30

कुर्डूवाडी : अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे कुर्डूवाडी शहरात छोट्या मोठ्या रस्त्यावर मधोमध खोदकाम केले आहे. ऐन पावसाळ्यात मलमपट्टी ...

Roads in Kurduwadi muddy due to incomplete works | अर्धवट कामांमुळे चिखलात फसले कुर्डूवाडीतील रस्ते

अर्धवट कामांमुळे चिखलात फसले कुर्डूवाडीतील रस्ते

Next

कुर्डूवाडी : अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे कुर्डूवाडी शहरात छोट्या मोठ्या रस्त्यावर मधोमध खोदकाम केले आहे. ऐन पावसाळ्यात मलमपट्टी म्हणून खोदलेल्या चरीत निघालेली काळी माती पुन्हा भरल्याने अक्षरशः रस्त्यावर मोठ्या चिखल झाला आहे. अंतर्गत रस्ते हे चिखलात फसले असल्याने दोन दिवसांत झालेल्या पावसात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.

पावसाची रिमझिम झाली तरी कुर्डूवाडीकरांना घसरगुंडीचा अनुभव घ्यावा लागत आहे. शहरातील या अर्धवट गटारींच्या कामांमुळे अंतर्गत रस्ते भकास बनले आहेत. विकास कामातील बोगसगिरीच्या आरोपावरून सर्वपक्षीय नेत्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. येथील कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय उपोषणही केले होते; परंतु संबंधित अधिकारीच रजेवर गेले असल्याने दोन दिवसांच्या आत त्यांना हे उपोषण प्रभारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावरून मागे घ्यावे लागले आहे. यामुळे नगरपालिकेतही वातावरण तापले आहे.

विकासकामांची भाषा करीत नगरपालिकेवर गत निवडणुकीत सत्तापरिवर्तन केले. मात्र, नंतर सत्ताधारी गटाने येथील विरोधी गटाच्या नगरसेवकांनाही आपल्यात सामावून घेतले आहे. त्यामुळे आता सारेच गप्प असल्याचा आरोप आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने यांनी केला आहे.

--

धुसफूस थांबेना

रखडलेल्या विकासकामांवरून सर्वपक्षीयांनी आंदोलन पुकारले. मात्र, याचवेळी संबंधित अधिकारी हे रजेवर गेले. नाईलाजाने आंदोलनकर्त्यांना प्रभारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनावरून आंदोलन मागे घ्यावे लागले. मात्र, यावरून एकीकडे पक्षीय राजकारणात अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून धुसफूस सुरू आहे.

--

सत्ताधारींनी विरोधी गटाला जवळ करून सगळे भाऊ भाऊ अन् भविष्यात मिळून राहू, असे धोरण स्वीकारले आहे. त्यानंतर विविध कामांचा सपाटा सुरू केला. यामध्ये कामात गलथान कारभार होत आहे. मात्र, यावर सत्ताधारी गट मूग गिळून गप्प बसत आहेत. नगरपालिकेच्या कामांबाबत सर्वसामान्य नागरिकांचा भरोसा उरलेला नाही.

दत्ताजी गवळी

- कुर्डूवाडी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

-----

फोटो : २० कुर्डूवाडी

कुर्डूवाडी शहरात अंतर्गत गटारींसाठी रस्ते खोदले आहेत. ठेकेदाराने व्यवस्थित बुजविले नसल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसात दुचाकी घसरून दोघे जण पडले. यावेळी खड्ड्यात पडलेली चप्पल शोधून काढताना दुचाकीस्वार. (छाया : लक्ष्मण कांबळे)

Web Title: Roads in Kurduwadi muddy due to incomplete works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.