फडातून निसटलेल्या बिबट्याचा गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:56+5:302020-12-09T04:17:56+5:30
चिखलठाण येथील पेटलेल्या उसाच्या फडातून निसटलेला बिबट्या शेटफळ शिवारात केळीच्या बागेत गेला. त्यानंतर ऊसतोड टोळ्यांनी रात्री आठ वाजता पाहिला. ...
चिखलठाण येथील पेटलेल्या उसाच्या फडातून निसटलेला बिबट्या शेटफळ शिवारात केळीच्या बागेत गेला. त्यानंतर ऊसतोड टोळ्यांनी रात्री आठ वाजता पाहिला. पुढे लबडे यांच्या वस्तीवर एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. त्यामुळे शेटफळमधील ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ८ वाजता चोरगेवस्ती परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेटफळ शिवारात ऊसतोड बंद करण्यात आली. वनविभागाचे पथक चोरगे वस्तीकडे डॉगस्कॉड घेऊन तपासासाठी आले व बिबट्याच्या पावलांच्या ठशावरून त्यांनी तपास केला.
दरम्यान, दुपारी चिखलठाण येथील कोटलिंग मंदिर परिसरात ऊसतोड मजूर लघुशंकेसाठी गेला असता त्यास बिबट्या दिसल्याने तो घाबरून पळत असताना पडून जखमी झाला. ही खबर वनखात्याला लागताच वनखात्याचे पथक कोटलिंग मंदिर परिसरात शोधकार्य करण्यासाठी गेले. तेथे कसून पाहणी केल्यानंतर काहीच हाती लागले नाही. दुपारी वनखात्याचे पथक शेटफळ ते दहिगाव शिवारात सायंकाळपर्यंत बिबट्याच्या पावलांच्या ठशाचा माग घेत होते.
------
दहिगाव व वांगी नं.२ डेेंजर झोन
वनखात्याच्या अधिकाऱ्याबरोबर मंगळवारी दुपारी ३ वाजता पाहणी करत असताना शेटफळकडून दहिगावकडे बिबट्या गेल्याचे पावलांच्या ठशावरून दिसत आहे. हा बिबट्या नरभक्षक असून, त्याने अंजनडोह येथे ५ डिसेंबर रोजी महिलेस मारल्यानंतर काहीही खाल्लेले नाही त्यामुळे तो भुकेलेला असून, त्याचे वास्तव्य दहिगाव व वांगी नं.२ मध्ये असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी.
-श्रीकांत पाडुळे, पोलीस निरीक्षक, करमाळा
बिबट्याला माणसांच्या रक्ताची चटक
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या बिबट्याने या अगोदर तब्बल नऊ जणांचे बळी घेतले असून, त्याला माणसांच्या रक्ताची चटक लागली आहे. जालनापासून पैठण त्यानंतर भगवानगड, किणी, पारगाव व आता करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह, चिखलठाणकडे आला असून, तो सतत जागा बदलत आहे.
- डॉ. चंद्रकांत मंडलिक, शार्पशूटर, वनखाते
फोटो०८करमाळा-बिबट्या०२
चिखलठाण येथे बिबट्याच्या माग घेताना शार्पशूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक. समवेत माजी आमदार नारायण पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे.