टॉवरच्या सुरक्षा रक्षकावर तलवारीने हल्ला दरोडेखोरांचा तलवारीने हल्ला; दोघांना पकडले ; तिघेजण गेले पळून
By प्रताप राठोड | Published: April 12, 2023 05:34 PM2023-04-12T17:34:34+5:302023-04-12T17:35:09+5:30
पोलिसांना दिल्यानंतर तातडीने नरखेड येथे धाव घेत पकडलेल्या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले.
सोलापूर : मोबाइल कंपन्यांच्या टॉवरच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला करत पळून जाणाऱ्या पाच चोरट्यांचा पाठलाग ग्रामस्थांनी केला. त्यातील दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार घडला. ही घटना मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान नरखेड (ता. मोहोळ) येथे घडली.
फिर्यादी नितीन चांगदेव मोटे (रा. नरखेड) हे नरखेड येथील एका खासगी कंपनीच्या मोबाइल टॉवरवर देखरेखीचे काम करतात. मंगळवारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मोबाइल टॉवरची साईड डाऊन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मोटे हे टॉवरजवळ गेले. मोटे यांनी केबिनच्या आत जाऊन पाहणी केल्यानंतर दोघेजण केबिनच्या बाहेर आले व मोटे यांना मारहाण करू लागले, तर तिसराही झटापट बघून केबिनच्या बाहेर आला व त्याने हातातील तलवारीने मोटे यांच्या पोटावर वार केला.
दरोडेखोरांनी तलवारीने हल्ला केल्यानंतर जखमी मोटे यांनी टॉवर रूमच्या बाजूने पळत जाऊन चोर आलेत, चोर आलेत असे म्हणून ओरडू लागल्याने टॉवर रूममधील तिघेजण व समोर बसलेले दोघेजण असे एकूण पाचजण पळू लागले. हल्ला झाल्यानंतर मोटे यांचा आवाज ऐकून नरखेड एसटी स्टँडवर बसलेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चिलारीत लपलेल्या पाचजणांपैकी रोहन रावसाहेब धोत्रे (रा. पंढरपूर) आणि अविनाश परशुराम गायकवाड (रा. कोंडवा, पुणे) या दोघांना नागरिकांनी पकडले, तर इतर तीनजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तातडीने नरखेड येथे धाव घेत पकडलेल्या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले.