भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांच्या घरी दरोडा; पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:17 PM2020-01-22T12:17:00+5:302020-01-22T12:17:55+5:30
माढ्यातील घटना; चाकूचा धाक दाखवून १६ तोळे सोने व रोख रक्कम लंपास
माढा : माढ्यातील दोन ते तीन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून पाच ते साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना बुधवारी पाहटे घडली आहे.
विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे राहणाºया कुमार चवरे व कुर्डूवाडी रोड लगतच्या मिठू वाघ यांच्या घरी बुधवारी अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले आहे. यामध्ये १६ तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. तर या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक डॉ़ सिध्देश्वर भोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
शहरातील कुमार चवरे यांच्या घराची कडी काढून घरामध्ये चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले. यावेळी दरोडेखोरांनी घरातील राधिका चवरे यांना मारहाण केली असून यात महिला जखमी झाली आहे. मिठू वाघ यांच्या कुर्डुवाडी रस्त्यावरील रोकडोबा मंदिराशेजारील घरातील रोख रक्कम व अंदाजे दोन तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. तर सराफ गल्लीमध्ये चोरी झाली आहे. याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरीस गेलेले सोने व रोख याबाबत नेमकी माहिती पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी तातडीने श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण केले आहे. श्वान पथक सध्या दरोडेखोरांचा मागोवा घेत आहे. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून माढयात चोºया व दरोडयांचे सत्र वाढले आहे. परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.