वडशिंगे येथे पहाटे पडला दरोडा; पती, पत्नी जखमी, लाखोंचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 06:22 PM2021-11-06T18:22:15+5:302021-11-06T18:28:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
माढा : माढा तालुक्यातील वडशिंगे येथे ऐन दिवाळीच्या पाडवा पुजनाच्या रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला आहे. यामध्ये दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत स्टॅम्प रायटर सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा रितेश हे जखमी झाले आहेत.
एकीकडे लोक दिवाळीचा आनंद घेत असताना अनेक ठिकाणी अपघात आणि चोऱ्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. वडशिंगे येथील कदम कुटुंबाला मारहाण करून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे.
चोरी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आलेली असतानाही वडशिंगे येथे हा दरोडा पडला आहे. वडशिंगे गावात मध्यभागी असलेल्या सुरेश कदम यांच्या घरावर मध्यरात्री हा दरोडा पडला. घरात प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी लाकडी दांडके आणि पाईप यांनी मारहाण करीत घरातील सदस्यांकडे सोने आणि पैशाची मागणी केली. यावेळी दरोडेखोरांनी रोख रक्कम ९० हजार आणि ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, झुबे, पैंजण, जोडवे असा २ लाख ८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.
हा दरोडा घालून दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या आणखी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. हा प्रयत्न होण्याआधीच ग्राम सुरक्षा दल सावध झाले होते. फोन खणखणल्याने लोक जागे झाले होते त्यामुळे दरोडेखोरांना येथून पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे आणखी एक दरोडा टळला आहे.