आई, मामाच्या लग्नाचा वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 08:50 AM2021-05-10T08:50:38+5:302021-05-10T08:51:21+5:30

अक्कलकोट-चपळगाव मार्गावरील पुलानजदीकचा रस्ता ठरतोय मौत का कुऑ

Rohan, who went to fetch his mother, uncle's wedding birthday cake, died accidentally | आई, मामाच्या लग्नाचा वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनचा अपघाती मृत्यू

आई, मामाच्या लग्नाचा वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनचा अपघाती मृत्यू

googlenewsNext

चपळगाव : एकाच मांडवात आई व मामाचा झालेल्या लग्नाचा वाढदिवस रविवारी. लग्नाच्या वाढदिवशी आई व मामाला शुभेच्छा देण्यासाठी केकची व्यवस्था कशी करावी? हा प्रश्न रोहनला भेडसावत होता. कारण रविवारपासून कडक लाॅकडाऊनची घोषणा. मग काही करून शनिवारीच केकची व्यवस्था करायची या बेताने अक्कलकोटला गेलेल्या रोहनचा अक्कलकोट-चपळगाव मार्गावरील पुलाजीकच्या रस्त्यावर ट्रकखाली चिरडून अपघाती मृत्यु झाला. केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनवर काळाने झडप घातली अन् सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला.

मयत झालेला रोहन राम व्हनकडे (वय २२ वर्षे) हा दोनच महिन्याखाली महावितरणमध्ये कंत्राटी पध्दतीने कामाला लागला होता. आई अंगणवाडीची मदतनीस अन् वडिल मजुरीचे काम करतात. या दोघांनी मोठ्या कष्टातुन संसार उभा केला. या जाणीवेतून रोहन मोठ्या जिद्दीने महावितरणमध्ये काम करत होता. मुळचे वळसंगचे असलेले व्हनकडे कुटूंब चपळगावला स्थायिक झालेले. गावातच मामा अनिल कांबळे असल्याने सतत मामाच्या सानिध्यात वावरलेल्या रोहनने आई-मामाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक शनिवारीच मिळवायचा हा निश्चय रोहनने केला.


शनिवारी नेहमीप्रमाणे कामाला गेलेल्या रोहन व्हनकडे यांने कर्जाळ गावातील काम संपवून अक्कलकोटला मित्र कल्याणी मुनाळे (रा.काझीकणबस) याच्यासोबत  केकसाठी गेला. मोठी खटाटोप करून केक मिळविल्यानंतर आनंदाने रोहन आपल्या मित्रासोबत चपळगावच्या दिशेने जात असताना अक्कलकोटनजीक पुलाजवळ ट्रकच्या धडकेने रोहनचा जागेवरच अपघाती मृत्यु झाला.
अपघात इतका भयानक होता की यामध्ये रोहनच्या पायाला,डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली होती.आणि म्हणूनच उपचारापूर्वी डाॅक्टरांनी रोहनला मृत झाल्याचे घोषित केले.अजिंक्य कांबळे यांनी फिर्याद दिली असून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याकडून अधिक तपास सुरू आहे.


छोट्या कामातुन वाचतील लाखमोलांचे जीव,

अन्यथा लाॅकडाऊननंतर आंदोलनाचा इशारा..!_

सध्या अक्कलकोट-सोलापूर मार्गाचे काम सुरू आहे.जड वाहनांसाठी सोलापूर मार्गावरून बायपास पध्दतीने चपळगाव मार्गाला लागूनच हा रस्ता विभागून गेला आहे.त्यातच चपळगाव मार्गावरून मोठ्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे. याच कारणामुळे अक्कलकोट-चपळगाव व सोलापूर-गुलबर्गा या एकमेकांना छेदलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहने दिसत नाहीत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांमध्ये अनेक अपघात घडले आहेत. कित्येकांचे जीव गेले आहेत. म्हणून याठिकाणी छेदलेल्या दोन्ही मार्गावर पुलाजवळ गतिरोधक बनविल्यास अपघात टाळता येतात. म्हणूनच संबधितांनी ताबडतोब गतिरोधक बनविण्याची मागणी चपळगाव पंचक्रोशीतील जनतेतुन होत आहे.अन्यथा लाॅकडाऊननंतर मोठे आंदोलन करण्याचा इशारा सरपंच उमेश पाटील यांनी दिला आहे. 

Web Title: Rohan, who went to fetch his mother, uncle's wedding birthday cake, died accidentally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.