रोहिणी नक्षत्राची सोलापुरात बरसात; जिल्ह्यात ८२ मंडळांत पडला पाऊस
By रवींद्र देशमुख | Published: June 6, 2024 06:22 PM2024-06-06T18:22:05+5:302024-06-06T18:23:02+5:30
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे.
रविंद्र देशमुख, सोलापूर : रोहिणी नक्षत्राने जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे. ९१ पैकी ८२ महसुली मंडळांत ५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे.
यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे. रोहिणी नक्षत्राने यंदा सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन- चार मंडळ वगळता इतर मंडळांत पाऊस पडला. मात्र, चार- पाच मंडळांत ५ मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ९१ पैकी ९ मंडळांत ५ मि.मी.पेक्षा कमी, तर इतर मंडळांत त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. उत्तर तालुक्यातील पाच मंडळांत ६० मि.मी. म्हणजे जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या ५२ टक्के इतका, दक्षिण तालुक्यात २६ मि.मी. म्हणजे २८ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३२ मि.मी. म्हणजे जून महिन्याच्या ३१ टक्के, मोहोळ तालुक्यात ५१ मि.मी. ५६ टक्के, तर करमाळ्यात ५३ मि.मी. म्हणजे ५३ टक्के पाऊस पडला आहे.
मार्डी मंडळात सर्वाधिक पाऊस...
जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सलग दोन दिवस पाऊस पडला आहे. मार्डी मंडळात जिल्ह्यात सर्वाधिक ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर सोलापूर मंडळात ७९ मि.मी., वडाळा मंडळात ४९ मि.मी., मुस्ती मंडळात ४४ मि.मी., तर मंद्रूप मंडळात ४२ मि.मी. पाऊस दोन दिवसांत पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १०२.५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ३०.७ मि.मी. पाऊस पडला असून जवळपास ३० टक्के इतका पाऊस ५ जूनपर्यंत पडला आहे. मृग नक्षत्र शनिवार दिनांक ८ जून रोजी निघणार असून वाहन कोल्हा आहे. शुक्रवारच्या उत्तर रात्री म्हणजे शनिवारी मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे.