सोलापुरात पताक्यांचा रांगा, घरांवर झेंडे; चौका-चौकात पोस्टर, मंदिरं फुलांनी सजली
By काशिनाथ वाघमारे | Published: January 21, 2024 07:26 PM2024-01-21T19:26:10+5:302024-01-21T19:26:20+5:30
अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आनंदी माहोल बनला आहे.
सोलापूर: अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आनंदी माहोल बनला आहे. बाजारपेठांमध्ये पताक्यांच्या रांगा लागल्या आहेत. घरांघरांवर झेंडे लावले गेले आहेत तर चौका-चौकात श्रीरामांचे पोस्टर लागले आहेत. तसेच शहरतील मंदिरं ही फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजली आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात टिळक चौकात श्रीरामांच्या मोठे उंच पोस्टर आणि बॅनर लागले आहेत.
तसेच सरस्वती चौक, मुरारजी पेठ, भैय्या चौक, मेकॅनिक चौक, पार्क चौक येथेही मोठमोठे बॅनर लागलेले दिसले. मधला मारुती येथील हलवायाच्या दुकानांनी मिठाई खरेदीसाठी रविवारी रामभक्तांची दिवसभर गर्दी होती. तसेच याच चौकातील फुलविक्रेत्यांकडेही हार आणि गुलाब पाकळ्यांसाठीही रामभक्तांची गर्दी दिसून आली. आसरा चौकातील छत्रपती ग्रूपच्या वतीने सोमवारी माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या वतीने १ लाख लाडू वाटप केले जाणार असून एका मंगल कार्यालयात हे लाडू बनवण्याचे काम सुरू आहे.
श्रीराम मंदिरात रांगोळीतून साकारली ३५ फुटाची प्रतिकृती
पूर्वभागात श्रीराम मंदिरात गेल्या चार दिवसांपासून तयारी सुरू आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता रक्तदान शिबीराला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ५० दात्यांचे रक्तदान झाले. तसेच या मंदिरात २० बाय ३५ फूट आकारात श्रीरामांची प्रतिकृती आर्ट ऑफ सोलच्या मुलींनी एकत्रित येऊन साकारली.