नुकसानभरपाईचे ३७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:30+5:302021-02-17T04:27:30+5:30
करकंब : पंढरपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची ३६ कोटी ९६ लाख ८९ हजार ...
करकंब : पंढरपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची ३६ कोटी ९६ लाख ८९ हजार ५५० रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमुळे अनुदान जमा करण्यास विलंब झाल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले. त्याची शासनाकडून उपलब्ध निधीनुसार पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाईची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी पूर्वीच जमा केली होती.
तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाने जानेवारी महिन्याच्या पंधरवाड्यात तहसील कार्यालयाकडे जमा केले होते परंतु तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने महसूल विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. शिवाय काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास विलंब झाला. यामधील ३६ कोटी ९६ लाख ८९ हजार ५५० रुपयांची रक्कम मंगळवारी जमा केली आहे. यामधून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठीची ५ कोटी रुपयाच्या निधीसाठी कोषागाराकडे मंजुरी मागितली आहे. मंजुरी मिळताच उर्वरित रक्कम त्वरित या आठवडा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.
कोट
तालुक्यातील ६५ हजार पेक्षा जास्त नुकसानग्रस्त खातेदार असल्याने नुकसानभरपाईच्या याद्या तयार करणे, क्षेत्राचा व पिकाचा ताळमेळ घेणे ही मोठी क्लिष्ट प्रक्रिया आहे. प्रत्येक नुकसानग्रस्ताना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
-
सचिन ढोले,
प्रांताधिकारी पंढरपूर
-----