आठवड्यानंतरही आरटीपीसीआरचे रिपोर्ट येत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:54+5:302021-04-23T04:23:54+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, कौठाळी, कळमण, बीबीदारफळ, गुळवंची, रानमसले व इतर गावांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची लक्षणे ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, कौठाळी, कळमण, बीबीदारफळ, गुळवंची, रानमसले व इतर गावांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. रॅपिड टेस्ट केली असता पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण वाढले आहे. आरटीपीसीआर टेस्ट केली असता तिचा अहवाल सहा-सात दिवस येत नसल्याचे चित्र आहे. तपासणीच्या रिपोर्टची वाट पाहत आजार अंगावर काढल्याने आजार वाढून उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. एकतर दवाखान्यात बेड मिळत नाही. शिवाय आजार वाढल्याने रेमडेसिविरची गरज भासते. मात्र, ते मिळत नाही. त्यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा कोलमडल्याने चित्र आहे. एप्रिल महिन्यातील २० दिवसांत ३६२ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या आहेत.
---
२१ दिवसांत १५ मृत्यू
बीबीदारफळ गावात २५ मार्च ते २१ एप्रिल या २१ दिवसांत कोरोना, इतर आजार व वृद्धापकाळाने १५ व्यक्ती दगावल्या आहेत. दवाखान्यात बेड मिळत नसल्याने इतर आजार असलेल्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने काहींचा जीव जात आहे. बीबीदारफळ येथील ६३ व्यक्तींची १५ व ४० व्यक्तींची १९ एप्रिल रोजी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. मात्र, तिचा अहवाल आलेला नाही.
---वडाळा परिसर हाॅटस्पाॅट
वडाळा येथे मंगळवारी रॅपिड टेस्टमध्ये ४८ पॉझिटिव्ह निघाले. त्यामध्ये वडाळ्याचे २७, बीबीदारफळचे १० व इतर लगतच्या गावातील आहेत. बुधवारी बीबीदारफळमध्ये पुन्हा १२ जण निघाल्याने येथील पॉझिटिव्ह संख्या १०९, तर वडाळ्याची १८७ झाली आहे.
----
दोन शेड, तीन शव
बीबीदारफळ येथील नरसूबाई मोतीराम चौगुले यांचे मंगळवारी निधन झाले. सार्वजनिक स्मशानभूमीत असलेल्या दोनपैकी एका शेडमध्ये नरसूबाईंचा अंत्यविधी करण्यात आला. बुधवारी नवनाथ गोरोबा साठे व सुनंदा उद्धव जाधव यांचा मृत्यू झाला. नरसूबाईंचा तिसरा बुधवारी झाला. त्यामुळे तेथे जागा नसल्याने नरसूबाईंच्या राखेशेजारीच एकाचा अंत्यविधी करावा लागला.
----