रुबाब संपला.. मिळाली जनरल ड्यूटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:25+5:302021-06-24T04:16:25+5:30
त्याचं असं झालं की, सांगोला पोलीस ठाण्याला आत्तापर्यंत अनेक पोलीस अधिकारी आले.. गेले.. त्यामध्ये प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असणं ...
त्याचं असं झालं की, सांगोला पोलीस ठाण्याला आत्तापर्यंत अनेक पोलीस अधिकारी आले.. गेले.. त्यामध्ये प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असणं स्वाभाविक आहे. पोलीस ठाण्यातील गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक २४ तास कार्यरत असते. दोन-तीन महिन्यापूर्वी या पोलीस ठाण्याला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात थेट फलक लावून नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. ते ‘सेट’ होतात तोच त्यांची पोलीस मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आता नवीन पोलीस निरीक्षकांनी पदभार घेतला. अवघ्या काही दिवसातच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखाच बरखास्त केली आणि त्याऐवजी विशेष पथकाची नेमणूक केलीय. त्यामुळे आता साहेबांच्या मर्जीतील पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांचे विशेष पथक गुन्ह्याचा तपास करीत आहे , मात्र नवीन साहेबांच्या या निर्णयामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील नेहमी जनमानसात रुबाबात वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. या कर्मचाऱ्यांना आता वायरलेस, गार्ड अंमलदार, वाहतूक शाखेच्या पोलिसांसमवेत जनरल ड्यूटी करावी लागत आहे. त्यामुळे शेवटी न राहवून असे पोलीस कर्मचारी आपल्याला काय, कोठे तरी कामच करायचे आहे, अशी सारवासारव करुन हिरमुसलेल्या चेहऱ्याने नाराजी लपवत आहेत.
- अरुण लिगाडे, सांगोला