अक्कलकोटच्या अडतीत वाढला उडदाचा रुबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:56+5:302021-08-25T04:27:56+5:30
यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला. तेव्हा शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बी-बियाणे, खत खरेदी करून खरिपाची पेरणी केली. त्यानंतर वेळेत ...
यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला. तेव्हा शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बी-बियाणे, खत खरेदी करून खरिपाची पेरणी केली. त्यानंतर वेळेत कोळपणी, खुरपणी केल्यामुळे पीक जोमाने आले होते. त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. मात्र, हाती आलेल्या पिकाला चांगला दर मिळत आहे. आतापर्यंत चार हजार ५८० क्विंटल उडदाची आवक झाली आहे. त्यातील एक नंबर उदडाला उच्चांकी सात हजार ८८६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
..........
अक्कलकोट मार्केट यार्डात अक्कलकोट तालुका, तुळजापूर, दक्षिण सोलापूर, उमरगा या तालुक्यातून माल येत आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ राज्यात माल जात आहे. आतापर्यंत उडीद, मूग मिळून तब्बल सहा हजार ९०० क्विंटल धान्याची आवक झाली आहे. मध्यंतरी तालुक्यात पावसाने तब्बल १८ दिवस ओढ दिल्याने उत्पादनक्षमता साठ टक्क्याने घटली आहे.
कोट : शेतकऱ्यांनी शेतमाल साफ करून चाळून, वाळवून आणावा. यामुळे चांगले दर मिळण्यास मदत होते. परिसरातील बाजारपेठेत सर्वाधिक दर अक्कलकोट येथे मिळत आहे. विक्री मालाची पट्टी वेळेत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. काही अडचणी आल्यास संपर्क साधावा.
-एम.जी. बदोले, सचिव
..........
फोटो ओळ :
अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उदडाच्या लिलावाप्रसंगी स्वामीनाथ नागुरे, महादेव डोंगरे, बसवराज घिवारे, स्वामीनाथ हिप्पीरगी, भीमराव बिराजदार, कल्याणी बिराजदार, चनप्पा हळगोदे आदी.
(फोटो २४अक्कलकोट)