सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच अंदाजपत्रकात घोळ घालतात : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:29 PM2019-07-26T12:29:59+5:302019-07-26T12:40:56+5:30
पदाधिकाºयांकडेच लटकले सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक; २० दिवसांपासून सुरू आहे पडताळणी
सोलापूर : महापालिकेचे बहुमताने मंजूर झालेले अंदाजपत्रक अद्याप पदाधिकाºयांकडे पडून आहे. ते प्रशासनाकडे सादर झाले नसल्याचे प्रभारी नगरसचिव रऊफ बागवान यांनी गुरुवारी स्पष्ट केले. अंदाजपत्रकाला असाच उशीर झाला तर नगरसेवकांच्या भांडवली निधीवर गंडांतर येईल, अशी भीती पदाधिकाºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक या अंदाजपत्रकात घोळ घालत असल्याने त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा ९ जुलै रोजी झाली होती. सत्ताधारी भाजपने मांडलेले २०१९-२० वर्षातील अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले होते. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह त्यात समाविष्ट करण्यात आले होते. सत्ताधाºयांच्या सूचना आणि विरोधकांच्या उपसूचना नगरसचिव कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या. नगरसचिव कार्यालयाने अंदाजपत्रक आणि त्यावरील सूचना व उपसूचना महापौर कार्यालयात सादर केल्या आहेत.
अंदाजपत्रकात हद्दवाढ भागातील नगरसेवकांना ३० लाख रुपये तर शहरातील नगरसेवकांना २५ लाख रुपयांचा भांडवली निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाकडून निधी केव्हा मिळणार?, अशी विचारणा नगरसेवकांकडून संजय कोळी यांच्याकडे करण्यात आली. कोळी यांनी नगरसचिव रऊफ बागवान यांना बोलावून घेतले.
बागवान यांनी परंपरेनुसार अंदाजपत्रक महापौर कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सांगितले. महापौर कार्यालयात सादर करण्याची गरज काय, असा सवालही कोळी यांनी उपस्थित केल्यानंतर बागवान यांनी पुन्हा परंपरेकडे बोट दाखविले. परंतु महापौर शोभा बनशेट्टी यांनी हे अंदाजपत्रक दोनच दिवसांपूर्वी आपणाकडे आल्याचे सांगितले.
सभागृहात एक चर्चा होते. सूचना वेगळी येते. परवा तर कहरच झाला होता. एका नगरसेवकाने सूचना आणि उपसूचना घरी मागवून घेतल्या होत्या. या नगरसेवकाने त्याला हवी तशी सूचना लिहून पाठविली होती. पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता यांच्या सहीच्या खाली लिहिले होते. या सर्व गोष्टी पाहण्याची जबाबदारी माझी आहे. पुन्हा हे माझ्या नावाने बोलायला मोकळे. अंदाजपत्रकाच्या सूचना फार मोठ्या आहेत. त्यात उपसूचना समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. हे अंदाजपत्रक २३ जुलै रोजी माझ्याकडे आले आहे. अंदाजपत्रक झाल्यानंतर ही मंडळी त्याचे काय लोणचं घालीत होती का ? असाही सवाल महापौर शोभा बनशेट्टी यांनी लोकमत समोर बोलून दाखविला़