पंढरपूर ग्रामीणमध्ये कोरोनावर ‘भोसे पॅटर्न’ ठरतोय सर्वाधिक प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:56+5:302021-04-27T04:22:56+5:30
भोसे गावामध्ये सध्या जवळपास ४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून हे रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासनाने ...
भोसे गावामध्ये सध्या जवळपास ४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून हे रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम गावात ग्रामसमितीत असलेले सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, डॉक्टर, पोलीस आदींच्या समितीने गावात एखादा संशयित रुग्ण जरी आढळला तरी त्याची प्राथमिक तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. संसर्ग टाळण्यासाठी त्या व्यक्तीला आवश्यक ठिकाणी काही दिवस विलगीकरणात ठेवले जाते. त्यानंतरही तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला मानसिक आधार देण्यापासून आवश्यक असणारे उपचार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एखाद दुसरा रुग्ण सोडल्यास कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न लावता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम घालून दिल्यानंतर गावात लहान-मोठे व्यापारी, सर्व ग्रामस्थ आपल्या कोणत्याही नफा-तोट्याचा विचार न करता प्रशासनाचे नियम पाळत आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात छोट्या-छोट्या गावांमध्ये दररोज रुग्ण वाढत असले तरी मागच्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेले भोसे गाव मात्र या लाटेत कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहे. भोसेकरांनी राबविलेल्या या पॅटर्नमुळे तालुका प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. भोसेप्रमाणेच इतर गावांनी योग्य नियोजन केल्यास कोरोनाला रोखणे अशक्य नाही. भोसे पॅटर्न इतर गावांना प्रभावीपणे राबविल्यास कोरोनावर नक्की विजय मिळवू, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
कोट :::::::::::::::::::::::
पहिल्या लाटेत माझ्यासह आमच्या अख्ख्या गावात सर्वाधिक नुकसान सहन केले आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही कोरोनाला हरवायचंच या उद्देशाने प्रशासनाने दिलेले नियम, अटींचे तंतोतंत पालन केले. ग्राम समितीमार्फत संशयित, पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर झालेले प्राथमिक उपचार यांची योग्य काळजी घेत यासाठी व्यापारी, पोलीस इतरांनीही योग्य सहकार्य केल्यामुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यास आम्ही यशस्वी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णही कमी होत असल्याने लवकरच भोसे कोरोनामुक्त होईल.
- ॲड. गणेश पाटील
सरपंच, भोसे
कोट :::::::::::::::::::::
भोसे गावाने प्रशासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळले आहेत. त्याठिकाणी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. पॉझिटिव्ह झाल्यानंतर तो रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडपर्यंत जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्ण, मृत्यू, संशयित रुग्णांचे प्रमाणही घटत आहे. हेच नियम इतर गावांनी व शहरात पाळल्यास कोरोनाला रोखणे शक्य आहे.
- सचिन ढोले
प्रांताधिकारी, पंढरपूर
मानसिक आधार, संसर्ग रोखणे हेच प्रभावी उपचार
कोरोना झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यामुळे खचून पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रथम त्या रुग्णांना व त्याच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्याशिवाय योग्य काळजी घेत संसर्ग रोखणे हे गोळ्या औषधांपेक्षा सर्वात प्रभावी उपचार असल्याचे मत भोसेचे सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी व्यक्त केले.