संचारबंदीच्या आधीच धावपळ; अधिक काळ टिकणाºया फळभाज्या महाग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:07 PM2020-07-15T12:07:43+5:302020-07-15T12:09:47+5:30
वांगे, उसळ, बटाटा, शेवग्याला अधिक पसंती
सोलापूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांची कडक संचारबंदी होणार असल्याने सोमवारपासून शहरवासीयांची धावपळ सुरू झाली. आठ दिवसांमध्ये भाजीपाला खरेदीवरही बॅन आल्याने सोलापूरकरांनी भाजीपाला मंडईत खरेदीसाठी गर्दी केली. अधिक काळ टिकणाºया म्हणजेच आठ दिवस पुरेल इतक्या फळभाज्यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला.
सोमवारी सोलापूर मार्केट यार्डात बटाट्याच्या गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे बटाट्याचे दर वाढले आहेत. गुरुवारपासून संचारबंदी होणार असल्यामुळे रविवारपासूनच मार्केटमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाढत आहे. यामुळे मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात तीस रुपये किलो असणारे बटाटे सोमवारी चाळीस रुपये किलो दराने विकले जात होते. मिरच्यांचा दर गेल्या काही दिवसांपासून वाढला असून सध्या चाळीस ते साठ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. मागील आठवड्यात तीस रुपये किलोपर्यंत दर होता. याचबरोबर शेवग्याच्या शेंगा, वांगे, कांदे, बटाटे हे जास्त दिवस टिकणारे असल्यामुळे यांची मागणी वाढली आहे. कारले, गवार यांचे दर स्थिर असून, सध्या कारले चाळीस तर गवार तीस रुपये किलोपर्यंत दर आहे.
तसेच पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ झाली असून मेथी दहा ते बारा रुपयांस पेंढी तर शेपू दहा रुपयांस विकली जात आहे. लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
सोलापुरातील किरकोळ बाजारात सध्या भेंडी ३० ते ४० रुपये किलो, दोडका ४० रुपये किलो, गवारी ३० रुपये किलो, कारले ४० ते ५० रुपये किलो, मिरची ४० ते ६० रुपये किलो, टोमॅटो ५० ते १०० रुपये किलो, वांगी ३० ते ४० रुपये किलो, पालक ५ रुपये पेंढी, मेथी १० ते १५ रुपये पेंढी, शेपू १० रुपये पेंढी, कोथिंबीर ५ ते १० रुपये पेंढी रूपयास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे़
पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांची मागणी वाढली आहे. यामुळे फळभाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या बटाटे, लसूण, मिरची, शेवगाशेंग यांची मागणी वाढली आहे. टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.
- श्रीशैल वाघमारे, भाजीविक्रेते.