बोटावर मोजण्याइतक्या गावात पेरणीची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:34+5:302021-06-24T04:16:34+5:30
माळशिरस तालुक्यात गेल्या आठवड्याभरात काही गावांमध्ये दमदार पाऊस पडला. ओढे-नाले भरून वाहिले, तर याउलट अनेक गावांमध्ये पेरणी करण्यायोग्य पाऊस ...
माळशिरस तालुक्यात गेल्या आठवड्याभरात काही गावांमध्ये दमदार पाऊस पडला. ओढे-नाले भरून वाहिले, तर याउलट अनेक गावांमध्ये पेरणी करण्यायोग्य पाऊस अद्याप पडला नाही. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात प्रथमच काही ठिकाणी पेरणीसाठीची धांदल तर काही ठिकाणी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे खरीप हंगामाच्या दृष्टीने थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
१६ ते २० जूनदरम्यान भाम, रेडे, गारवाड, चांदापुरी, निमगाव, वेळापूर, बोरगावसह तालुक्यातील काही गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची धावपळ सुरू केली. मात्र इतर गावातील स्थिती याउलट आहे. अनेक गावांमध्ये ओलावा होण्याइतपतही पाऊस पडलेला नाही.
पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा
सध्या ढगाळ हवामान व अधून-मधून पावसाच्या सरी येत असल्यामुळे सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस पडेल, अशी बळीराजाला अपेक्षा आहे. पाऊस सर्वत्र झाला तरच खरिपातील पिकांचे पेरणीखालील क्षेत्र वाढणार आहे. तालुक्यात सध्या खरिपातील बाजरी, मका, तूर आदी पिकांमध्ये फक्त बाजरी १०२.६ हेक्टर, मका १६६.४ हेक्टर, ऊस लागवड १०.५ हेक्टर, भुईमूग २.५ हेक्टरवर लागवड झाली असून, इतर पिकांच्या पेरणीसाठी तालुक्यात बळीराजा पावसाची वाट पाहात आहेत.