रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकास महाकेंद्रे कार्यान्वित करावीत: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:05 PM2024-05-09T21:05:37+5:302024-05-09T21:05:48+5:30
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संताजी शिंदे-सोलापूर: कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास झाला. परंतु आता काळ बदलला आहे. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार रोजगाराभिमुख कौशल्य विकास शिक्षणास प्राधान्य मिळाले आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासाची महाकेंद्रे कार्यान्वित करावीत असे प्रतिपादन संस्थेचे माजी विद्यार्थी व विद्यमान कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले. सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य केतनभाई शहा, उद्योजिका माधुरी पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश पवार, जैन सोशल ग्रुप सेंटरचे अध्यक्ष संजय शहा, डॉ.श्रीकांत येळेगावकर, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉ. नभा काकडे, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. उत्तमराव हुंडेकर, वसंत नागणे, काशीबाई ढेरे, मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाट, नितीन अनवेकर, विठ्ठल कस्तुरे, मल्लिकार्जुन हुंजे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. म्हणून कौशल्य विकासाची केंद्रे शिक्षणसंस्थांनी सुरू करावीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वालवडकर यांनी केले सूत्रसंचलन गजानन गोरे यांनी केले तर आभार केतनभाई शहा यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.