सचिनच्या निधीतून सोलापूर जिल्ह्यात विकासकामांचा ‘षटकार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:56 PM2017-11-01T12:56:59+5:302017-11-01T12:59:41+5:30
क्रिकेटचे मैदान गाजविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदार झाल्यापासून संसदेच्या सभागृहात फारसा दिसत नसला तरी सोलापूर जिल्ह्याला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला आहे.
राकेश कदम
सोलापूर दि १ : क्रिकेटचे मैदान गाजविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदार झाल्यापासून संसदेच्या सभागृहात फारसा दिसत नसला तरी सोलापूर जिल्ह्याला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. सचिनच्या खासदार निधीतून जिल्ह्यात सहा विकासकामे करण्यात आली असून त्यासाठी जवळपास ४८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
रालोआच्या काळात सचिन तेंडुलकरला खासदारकी बहाल करण्यात आली होती. मात्र तो संसदेच्या सभागृहात फारसा दिसत नाही, अशी टीका अलीकडच्या काळात सुरू झाली. परंतु, त्याच्या खासदार निधीतून अनेक ठिकाणी आवश्यक ती विकासकामे केली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार शरद बनसोडे यांच्या निधीतून विकासकामे केली जात आहेत. शिवाय राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार हुसेन दलवाई, खासदार संजय काकडे, खासदार माजीद मेमन आणि खासदार सचिन तेंडुलकर यांच्याकडूनही विकासकामांसाठी निधी मिळत आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि मूळची सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी मंडळींनी या खासदारांकडे पाठपुरावा करतात. अधिकाºयांच्या पाठपुराव्यामुळे सचिनकडून जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे विशेष कार्याधिकारी संतोष पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे इर्लेवाडी (ता. बार्शी) येथील शाळा खोल्यांसाठी २०१४-१५ या कालावधीत १४ लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला. मंत्रालयातील बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या बाबुराव बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे कोन्हाळी (ता. अक्कलकोट) येथील चार विकासकामांसाठी निधी मिळाला. करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथे २५ लाख रुपये खर्चून रस्त्याचे कामही करण्यात आले आहे.
-----------------------------
ही सहा कामे झाली
कै. लक्ष्मणराव डुरे-पाटील प्रशाला, इर्लेवाडी (ता. बार्शी) येथे २ वर्ग खोल्या बांधण्यासाठी १४ लाख ७० हजार. कोन्हाळी (ता. अक्कलकोट) येथे दोन ठिकाणी रस्ते व गटार करण्यासाठी ५ लाख ९६ हजार, कोन्हाळी गावासाठी स्ट्रीट लाईट बसविणे, एलईडी बसविण्यासाठी २ लाख ९६ हजार ९८७ रुपये, कोन्हाळी येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी २ लाख ९९ हजार रुपये, पोमलवाडी (ता. करमाळा) येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यासाठी २४ लाख ९८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचा २३ लाख ९४ हजार २७९ रुपयांचा हप्ताही अदा करण्यात आला आहे.
------------------
खासदारांकडूनही निधी
मंत्रालयात कार्यरत असलेल्या बाबुराव बनसोडे यांनी कोन्हाळी गावासाठी खासदार सचिन तेंडुलकरसह जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य आणि इतर राज्यसभा खासदारांकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यातून गावात बरीच विकासकामे झाली आहेत. बनसोडे यांच्या पत्नी सुमित्रा बनसोडे कोन्हाळीच्या सरपंच आहेत.