Sadabhau Khot: 'त्या' राष्ट्रवादीच्या नेत्याचं उत्तर, लाल टोमॅटोसारखे गाल म्हणत सदाभाऊंचा पुन्हा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:39 AM2022-06-18T10:39:20+5:302022-06-18T10:40:40+5:30
मी सांगोल्यात आल्यावर याबाबतची माहिती घेऊन बोलेन, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंके यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
सोलापूर/मुंबई - राष्ट्रवादीला सांगतो बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल. २१, २२ जूनला राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे. संघर्ष अटळ आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच, राष्ट्रवादीच्या लाल टोमॅटोसारखे गाल असलेला नेता म्हणत खोत यांनी टिका केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तालुक्यातील विकासकामांबाबत मी गेले तीन दिवस मुंबईत आलो आहे. घडल्या प्रकाराची मला काहीही माहिती नाही. कोण अशोक शिनगारे मला माहिती नाही, मी त्याला ओळखतही नाही. तो शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याबाबत खुलासा झाला आहे. तरीही मी सांगोल्यात आल्यावर याबाबतची माहिती घेऊन बोलेन, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंके यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीच्या नेत्यावर नाव न घेता टिका केली.
''टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात असू द्या, जशाच तसे उत्तर दिले जाईल. आता प्रस्थापितांविरुद्धची लढाई अजून तीव्र होणार.'', असा इशाराच खोत यांनी ट्विटरवरुन दिला आहे.
टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात असू द्या जशाच तसे उत्तर दिले जाईल.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 18, 2022
आता प्रस्थापितांविरुद्धची लढाई अजून तीव्र होणार.
सांगोल्यात घडलेल्या घटनेमागे लाल टॉमेटो सारखे गाल असलेला नेता कोण आहे, त्याचे नाव वेळ आली की सांगेन. आजपासून त्याचे बगलबच्चे बोलायला लागतील, त्यावरून तो कोण हे समजेल. अजून काही लोक त्याठिकाणी होते. या लोकांना मी ओळखतो. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला होता.
पवार कुटुंबीयांकडून जीवाला धोका
राष्ट्रवादी या पक्षापासून माझ्या जिवाला धोका आहे, हे मी लेखी कळवणार आहे. पवार कुटुंबाकडून धोका आहे. सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल परंतू त्यांची ही व्यवस्था, वाडा नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप केला आहे. तो हॉटेलमालक त्याला जेवढे सांगितले जायचे तेवढेच बोलत होता. मला गावातील लोकांचे फोन आले आणि तो किती भामटा आहे, वाळू माफिया आहे हे त्यांनी सांगितले, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.