सफर माळढोक अभयारण्याची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:34 PM2019-04-13T17:34:25+5:302019-04-13T17:35:02+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे माळढोक अभयारण्य आहे़

Safari Wildlife Sanctuary! | सफर माळढोक अभयारण्याची !

सफर माळढोक अभयारण्याची !

googlenewsNext

आयुष्यात स्वत:साठी जगताना थोडंसं मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. अन् दैनंदिन व्याप सांभाळत स्वानंदासाठी हे करत  गेलो आणि तो कायमचा छंद बनून गेला.  गेल्या १०-११ वर्षांपासून पक्ष्यांची सेवा करतो. पक्ष्यांसाठी १२ महिने माझ्या घरातील अंगणात पिण्याचे पाणी आणि धान्याची सोय करतो. त्यांचा चिवचिवाट कायम आपल्यासोबत राहावा यासाठी कृत्रिम घरटे सुद्धा ठिकठिकाणी लावले आहेत. माझ्या अंगणात कोकिळा, भारद्वाज, राखी, धनेश, चिमण्या, ग्रीन बी ईटर, होला, बुलबुल, सनबर्ड, पोपट, रॉबिन, मुनिया, सुगरण इ. पक्षी नेहमी येतात. आजवर अनेक चिमण्यांनी, सिल्व्हर बिल, बुलबुल, राखी वटवट्या या पक्ष्यांनी माझ्या घरच्या अंगणात पिल्लांना जन्म दिला. रोज सकाळी उठल्यावर बाऊलमध्ये पाणी आहे का ? नसल्यास भरणे, कचरा पडलेला असल्यास साफ करून घेणे. धान्य संपल्यास पुन्हा घालणे हा नित्यनियम सुरू आहे. पाण्याच्या बाऊलमध्ये पक्षी पाणी पितात. अंघोळ करतात, छानसं खेळत असतात. 

माळढोक अभयाण्याबद्दल खूप ऐकलं होतं. मला खंत वाटायची. एकदातरी ते पाहायचं. केवळ वृत्तपत्रातून वाचले होते की या पक्ष्यामुळे सोलापूरचे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे. मी मित्रांना विचारायचो. परंतु, तेही पाहिले नाही हेच उत्तर देत. नेहमी बार्शीला गाडीवर जाताना नान्नज परिसर आला  की माझी मान नकळत रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या माळरानावर वळत असे. काही क्षण थांबून सुद्ध पाहायचो. परंतु, माळढोक काही दिसत नव्हता. काही दिवसांनी मला मानद वन्यजीव रक्षक डॉ. निनाद शहा यांचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन करून माळढोकला पाहण्याची तीव्र इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी लागलीच होकार भरला. काही दिवसांनंतर आम्ही दोघेही नान्नजकडे रवाना झालो.

सकाळी ६.३० वाजता नान्नजच्या पन्नास हेक्टर परिसरात पोहोचलो. बाहेरच रस्त्यावर गाडी लावून चालत माळढोक दिसतो का पाहण्यासाठी निघालो. बराच वेळ निरीक्षण केले. परंतु, मोर आणि इतर पक्षी सोडले तर माळढोक काही दिसला नाही. तिथून अभयारण्याच्या शंभर हेक्टर परिसराकडे गेलो. तिथे वन कर्मचारी भागवत मस्के भेटले. शहा सरांनी माझी त्यांची ओळख करून दिली. आम्ही तिघेही तिथे असलेल्या निरीक्षण गृहातून निरीक्षण करत बसलो. शहा सरांनी सांगितले, शांत बसून निरीक्षण करत राहा. साधारण ११ वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो. परंतु, माळढोक दिसला नाही. आम्ही तिथून निघालो. माझे मन उदास झाले. मी म्हणालो, आता परत कधी? सर म्हणाले, येऊ दोन-चार दिवसांनी. चार-पाच दिवसांनी मी शहा सरांना नान्नजसाठी आठवण केली. मग ते म्हणाले तेथील (अभयारण्याचे) वातावरण बघून सांगतो. दुसºया दिवशी त्यांनी मस्केंना फोन करुन विचारले, तेव्हा त्यांच्याकडून माळढोक काल दिसला होता, असे कळाले. मग सर म्हणाले आपण दुपारीच निघू यात आणि आम्ही दुपारी ४ पर्यंत माळढोक अभयारण्यात पोहोचलो. माझ्या उत्सुकता ताणलेली.

आम्ही निरीक्षणगृहात जाऊन बसलो. दोन तास गेले आणि अचानक ५.३० च्या दरम्यान मला एक मोठा पक्षी उडताना दिसला आणि मी शहा सरांना म्हणालो बघा हा कोणता पक्षी आहे आणि दोघेही उत्तरले, माळढोक म्हणून. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही त्याच्या दिशेन कॅमेरा फिरवला. तोपर्यंत माळढोक ते माळरान व रस्ता ओलांडून दुसºया बाजूच्या माळरानावर गेला. मी आणि शहा सर १०० हेक्टरमधून बाहेर पडलो आणि दुसºया माळरानावर दबकतच गेलो. तिथे आम्हाला उंच, रुबाबदार असा हा माळढोक वावरताना दिसला. आम्ही आमच्या कॅमेºयात त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ अंधार होईपर्यंत आम्ही तेथेच त्याला पहात बसलो. आजचा दिवस सत्कारणी लागला म्हणून मी आनंदी झालो आणि परतलो. त्यानंतर अनेकवेळा माळढोकला पाहण्यासाठी अभयारण्याच्या चकरा सुरू झाल्या ते आजतागायत. अनेक राज्यातून माळढोकला पाहण्यासाठी लोक येतात हे त्यावेळी मला कळाले. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे.
- अनिल जोशी
(लेखक पर्यावरणप्रेमी आहेत)

Web Title: Safari Wildlife Sanctuary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.